कुडाळ भंगसाळ नदीचा गाळ काढण्याच्या पाचव्या दिवशी एक हजार २५० डंपर गाळ काढण्यात आला. त्यामुळे नदीला मोठय़ा प्रमाणावर पाणी मिळाले.

हे पाणी निश्चित कुडाळ शहरासाठी उपयुक्त असून पाऊस झाला नाही तरी त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार आहे असे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई म्हणाले. दरम्यान, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नदीपात्रातील गाळ की वाळू काढली जाते याची खात्री करा, असे जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आहेत.

कुडाळ भंगसाळ नदीची लोकसहभागातून गाळ काढण्यास सुरुवात करण्याअगोदर कुडाळ शहरातील अकरा संघटनांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला आहे. गाळ काढण्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनीच केला होता. गेले पाच दिवस सुमारे ४० डंपर आणि जेसीबी गाळ उपसा करत आहेत. पाच दिवसांत एक हजार २५० डंपर गाळ काढला गेला.

कुडाळ शहरात पाणीटंचाई जाणवू नये म्हणून हा उपक्रम सर्वानीच मिळून हाती घेतला आहे. जिल्हा प्रशासनालादेखील विश्वासात घेतले आहे, असे रणजीत देसाई म्हणाले.

नदीतील गाळ काढताना त्यातून वाळू उपसा करण्यात येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्याने वाळू की गाळ काढला जातो आहे, याचा तपास करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. मात्र गाळ काढण्यास कोणत्याही प्रकारे स्थगिती दिलेली नाही, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बोलताना सांगितले.

दरम्यान जिल्हा परिषद माजी सदस्य संजय भोगरे यांनी भंगसाळ नदीचा गाळ उपसावा म्हणून उपोषण केले होते. तेव्हा त्यांना आश्वासन मिळाले. पण जिल्हाधिकारी यांनी आश्वासनाकडे दुर्लक्ष केले. पण आज लोकसहभागातून काम सुरू झाल्याने हा विषय राजकीय चव्हाटय़ावर आला आहे.