भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आमदार पंकजा मुंडे यांनी सत्ता परिवर्तनाची हाक देत काढलेल्या संघर्ष यात्रेत उद्या (मंगळवारी) औरंगाबाद शहरात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी सहभागी होणार आहेत. केंद्रातून या यात्रेत सहभागी होणाऱ्या त्या पहिल्याच मंत्री आहेत.
गेल्या ५ दिवसांपासून सुरू असणाऱ्या या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचा दावा भाजपचे नेते आणि कार्यकर्ते करीत आहेत. यात्रेनिमित्त होणारी गर्दी मोठी असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही आवर्जून कळविले जात होते. त्यानंतर प्रथमच केंद्रीय मंत्री या यात्रेत सहभागी होत आहेत. यात्रेच्या प्रारंभी केंद्रातील नेते उपस्थित राहतील, असे पूर्वी सांगितले जात होते. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सहभागी होतील, अशी चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र, गेल्या ५ दिवसांत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस वगळता भाजपतील इतर नेत्यांनी यात्रेकडे तसे दुर्लक्षच केले होते. यात्रेदरम्यान पंकजा मुंडे यांच्या भाषणांना मात्र कमालीचा प्रतिसाद मिळत होता. कार्यकर्त्यांमध्ये उत्स्फूर्तता असल्याचे आवर्जून सांगितले जात होते. या पाश्र्वभूमीवर स्मृती इराणी यात्रेत सहभागी होणार आहेत. सकाळी अकराच्या सुमारास संघर्षयात्रा येथे येईल.
गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर पंकजा मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाईल, असे भाजप नेते वारंवार सांगत आहेत. राज्यातील आघाडी सरकारविरोधात ही संघर्षयात्रा असल्याचे सांगत पंकजा मुंडे यांनी पक्ष देईल ती जबाबदारी उचलू, असे भाषणात सांगितले. त्यांच्या संघर्ष यात्रेचे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठे कौतुक आहे. मराठवाडय़ात या यात्रेस प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुजीतसिंह ठाकूर व प्रवीण घुगे हे दोघे पूर्ण वेळ यात्रेसमवेत आहेत.
स्वागत सभांना होणारी महिला व तरुणांची गर्दी, आगमन होताच वाढणारा उत्साह, थेट लोकांशी संवाद पुन्हा एकदा दिवंगत मुंडेंची आठवण जागी करणारा ठरत आहे. भरपावसात तासन्तास वाट पाहणारी गर्दी पंकजांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, सामान्य माणसांच्या प्रश्नांना सहज हात घालण्याची पद्धत यामुळे वातावरण ढवळून निघत आहे.