मुंबई : दोन वर्षांपूर्वी झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये यश मिळाले असले तरी अलीकडे झालेल्या पोटनिवडणुका किंवा विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांमधील मर्यादित यश लक्षात घेता, लवकरच होणाऱ्या सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपची कसोटी लागणार आहे. दोन्ही महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळावी म्हणून भाजपने सारी ताकद पणाला लावली आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर सांगली आणि जळगाव जिंकणे भाजपसाठी प्रतिष्ठेचे बनले आहे. अलीकडेच झालेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत विदर्भ या बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव झाला. पालघर मतदारसंघात विजय मिळाला असला तरी शिवसेनेने तेथे भाजपला घाम फोडला. सांगली जिल्ह्यातील पलूस विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्याने काँग्रेसचे विश्वजीत कदम हे बिनविरोध निवडून आले आहेत. विधान परिषदेचा कोकण पदवीधर मतदारसंघ वगळता अन्य सर्व मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार पराभूत झाले. मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपने सारी ताकद पणाला लावली होती. तरीही भाजपने पुरस्कृत केलेला उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखले. नाशिक शिक्षक मतदारसंघात उमेदवार आयात करूनही भाजपच्या पदरी अपयशच आले. कोकण पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीतून आयात करण्यात आलेले निरंजन डावखरे यांनी विजय मिळविला. एकूणच अलीकडे राज्यात झालेल्या विविध निवडणुकांमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालेले नाही.

जळगाव हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. जळगाव भाजप म्हणजे एकनाथ खडसे हे समीकरण पक्के होते. पण, भाजपने अलीकडे खडसे यांना चार हात दूर ठेवीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी गिरीश महाजन यांना सारी ताकद दिली आहे. जळगाव जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व असले तरी शहरात मात्र सुरेश जैन यांचे वर्चस्व आहे. जळगाव घरकूल घोटाळ्यात सुरेशदादांना चार वर्षे तुरुंगवास पत्करावा लागला. गेल्या विधानसभा निवडणुकीत सुरेशदादा पराभूत झाले आणि भाजपचा आमदार निवडून आला. जामिनावर सुटल्यावर सुरेश जैन पुन्हा सक्रिय झाले असून, महानगरपालिकेवर आपलीच सत्ता आणायची या निर्धाराने ते निवडणुकीत उतरले आहेत. भाजप आणि शिवसेना युती होणार, असे आधी चित्र होते. पण दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांचा विरोध लक्षात घेता भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढत आहेत.

जळगावची महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकयचीच या निर्धाराने गिरीश महाजन रिंगणात उतरले आहेत. एरव्ही खडसे विरुद्ध सुरेश जैन असा सामना रंगत असे. यंदा भाजपची सूत्रे महाजन यांच्याकडे आहेत. भाजपने राष्ट्रवादी, मनसे, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली आहे. सुरेश जैन यांना जळगाववर पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. त्यांनी आधी खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा आदेश दिल्याने सुरेशदादांचा नाइलाज झाला. कारण चार वर्षांनी सुरेशदादांना जामीन मिळावा म्हणून शासकीय पातळीवर उद्धव ठाकरे यांनी शब्द टाकला होता. जळगावमध्ये भाजप आणि शिवसेनेतच लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणुकीच्या तोंडावर फाटाफूट झाली. काँग्रेसचे अस्तित्व नगण्य आहे.

सांगलीत भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी

पश्चिम महाराष्ट्रात पाया भक्कम करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे कोल्हापूरमध्ये भाजपला जिल्हा परिषदेची सत्ता मिळाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात भाजपला चांगले यश मिळाले होते. सांगली जिल्ह्यात भाजपला चांगले यश मिळाले आहे. १९६२ पासून काँग्रेसचा कधीही पराभव न झालेल्या सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपचे संजयकाका पाटील गेल्या वेळी निवडून आले. जिल्हा परिषदेत भाजपला यश मिळाले. आता सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका जिंकण्याचा भाजपचा निर्धार आहे. सांगलीत जनतेला बदल हवा आहे. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही भाजपलाच यश मिळेल, असा विश्वास सांगली जिल्हा भाजपचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केला. भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यावर स्वत:च्या बालेकिल्ल्यात यश मिळविण्याचे आव्हान राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सांगली आणि मिरज या दोन्ही विधानसभा मतदारसंघांतून भाजपचे आमदार निवडून आले होते. हाच कल कायम ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.