सांगलीतील विश्रामबाग येथे बारमध्ये दारु पिताना झालेल्या वादातून दोन जणांनी पोलिसाची हत्या केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी या आधारे हल्लेखोरांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.

सांगली जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले समाधान मानटे (वय ३०)  हे मंगळवारी रात्री ड्यूटी संपवून घरी जाण्यासाठी निघाले. घरी जाण्यापूर्वी ते विश्रामबागमधील कुपवाड रस्त्यावर हॉटेल रत्ना डिलक्समध्ये गेले. तिथे समाधान मानटे यांनी मद्यपान केले. मद्यपान करत असताना त्यांचे दोन तरुणांशी भांडण झाले. मद्यपान केल्यानंतर मानटे हॉटेलच्या व्यवस्थापकाशी हॉटेलच्या आवारातच बोलत होते. या दरम्यान, ज्या तरुणांशी मानटे यांचा वाद झाला होता ते बारमधून बाहेर पडले. काही वेळाने यातील एक जण कारमधून तीक्ष्ण हत्यार घेऊन परत हॉटेलमध्ये आला. त्याने मानटे यांच्यावर वार केले. हल्लेखोराने त्यांच्यावर जवळपास १८ वार केले. यात मानटे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

पोलिसाच्या हत्येचे वृत्त समजताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, संजयनगर, विश्रामबाग आणि सांगली शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला सुरुवात केली आहे.