News Flash

आभासी जगातला प्रियकर वास्तवात येतो तेव्हा

आभासी जगात ‘चंद्र-तारे देणारा’ कथित प्रियकर तिला हवाहवासा वाटत होता.

सांगलीत पोलिसांच्या मदतीने एक संसार वाचला

हातातल्या खेळण्यातील ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या आभासी जगात झालेल्या मत्रीतून पतीला सोडून प्रियकराकडे जाण्याचा हट्ट एका २५ वर्षांच्या विवाहित तरुणीला चांगलाच महागात पडला. शनिवारी झगमगत्या दुनियेतील वास्तव समोर येताच तिने स्त्रीहट्ट बाजूला ठेवत घरचाच बरा म्हणत सासरच्या मंडळीचे पाय धरत शरणागती पत्करली.

जत तालुक्यातील बनाळी गावच्या एका विवाहित तरुणीची आभासी जगात एका तरुणाशी मत्री गेली सहा महिने सुरू होती. या तरुणीला एक चार वर्षांचा मुलगाही आहे. मात्र आभासी जगात ‘चंद्र-तारे देणारा’ कथित प्रियकर तिला हवाहवासा वाटत होता. गेली चार महिन्यांपासून आभासी जगात वावरणाऱ्या प्रेमीयुगुलाने एकत्र संसार करण्याचा निर्णयही संदेशातून घेत एकमेकांना जन्मोजन्मीच्या आणाभाकाही घेतल्या. या दरम्यान, तिने पतीला व मुलाला सासरी सोडून प्रियकरासोबत जाण्याची मानसिकताही केली. यासाठी पतीसह सासरच्या लोकांनाही आपण प्रियकरासोबतच जाणार असल्याचे ठामपणे सांगितले. यामुळे अस्वस्थ झालेल्या घरच्या मंडळीनी जत पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांच्या कानावर ही बाब घातली. निरीक्षक मोहिते यांनी या तरुणाशी संपर्क साधण्यास तरुणीला सांगितले. तरुणीने शनिवारी सायंकाळी या तरुणाशी मोबाईलवर संपर्क साधला असता प्रेमवीराने आपण डफळापुरात असून अवघ्या २० मिनिटात जत बसस्थानकावर पोहोचत असल्याचे सांगितले. पोलिसांनी जत बसस्थानकावर सापळा रचून आभासी जगात वावरणाऱ्या प्रेमवीराला ताब्यात घेऊन तरुणीच्या समोर उभे केले.

मात्र या प्रत्यक्षातील प्रेमवीराला पाहताच तरुणी आभासी जगातून वास्तवात येत मला हा पसंद नाही म्हणत याच्याबरोबर जाण्यास नकार देऊ लागली.

मात्र तोपर्यंत वैतागलेल्या पतीनेही आभासी जगात वास्तव शोधणाऱ्या पत्नीशी आपण संसार करू शकत नसल्याचे सांगत सोडचिठ्ठी देण्याची तयारी दर्शवली. मात्र पोलिसांनी प्रेमवेडी झालेल्या तरुणीला पाय धरून शरणागती पत्करण्यास फर्मावले तेव्हा कुठे आभासी वातावरणात चंद्रावर जाऊन संसार करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणीचा संसार वाचला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 1:14 am

Web Title: sangli police save one family life
Next Stories
1 मोबाईल व्हॅनवरही बदलता येणार हजार, पाचशेची नोट – मुख्यमंत्री
2 उस्मानाबादेतून सहा तर नागपूरमधून पावणेदोन कोटींची रोकड जप्त
3 नव्या नोटा छापणाऱ्या नाशिक प्रेसमधील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार
Just Now!
X