दहा वर्षांपूर्वी भारतातील कृषी क्षेत्रासंदर्भात तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री  शरद पवार यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना एक पत्र लिहिलं होतं. सध्याच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान हे पत्र पुन्हा एकदा समोर आलं आहे. यावरुन सत्ताधाऱ्यांनी शरद पवारांना टार्गेट करताना त्यांच्या सध्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या पत्राबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केलं आहे.

संजय राऊत म्हणाले, “सन २०११ मध्ये शरद पवारांनी हे पत्र लिहिलं त्यावेळची परिस्थिती वेगळी असेल आत्ताची वेगळी आहे. स्वतः शरद पवार हे या देशातील कृषी क्षेत्रातील सर्वात मोठे तज्ज्ञ आणि अभ्यासक समजले जातात, त्यामुळे त्यांच्या पत्रासंदर्भात ते खुलासा करतील. ज्या अर्थी त्यांनी तेव्हा पत्र लिहिलं आणि आज शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत आहेत. याचा अर्थ ते शेतकरी नेते असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांशी सहमत आहेत. लाखो शेतकरी रस्त्यावर उतरलेले असताना कोणताही नेता त्यांच्या भावनेशी प्रतारणा करणार नाही, याच दृष्टीने शरद पवार यांच्या भूमिकेकडे पहायला हवं”

आणखी वाचा- भारत बंदला पाठिंबा देणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचं शेतकरी प्रेम नकली – भाजपा

शरद पवारांनी पत्रात काय म्हटलं होतं?

केंद्रीय कृषीमंत्री असताना शरद पवार यांनी नोव्हेंबर २०११ मध्ये राज्य सरकारांना पत्र लिहिलं होतं. यामध्ये खासगी कृषी समित्यांना परवानगी देण्याबाबत उल्लेख करण्यात आला होता. तसेच विपणन रचनेत खासगी गुंतवणूक वाढवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायदा बदलायला हवा, असं त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. शेती व्यापार, शेतकरी आणि ग्राहक यांच्या हितासाठी शेतमालाच्या विक्रीसाठी नवा मार्ग शोधता येईल, असा मुद्दाही शरद पवारांनी या पत्रात मांडला होता. भाजपा नेते बी. एल. संतोष यांनी हे पत्र आता समोर आणलं आहे.

आणखी वाचा- शरद पवारांचा मोदी सरकारला इशारा; म्हणाले,”…तर हे दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही”

भाजपाचा काय आहे आक्षेप?

“काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात खाजगीकरण सुरू झालं. शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी पाठवलेलं पत्र आज समोर आहे. या पत्रात शेतकऱ्यांच्या हितासाठी खाजगीकरणाला चालना देण्याबाबत त्यांनी लिहीलं आहे आणि आता शरद पवार आपली हीच भूमिका बदलत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आहेत. त्यामुळे त्यांचं शेतकरी प्रेम हे नकली आहे,” असा आरोप भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.