सरकारकडून जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्कारावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. भारतरत्न पुरस्कारात स्वातंत्र्यवीर सावरकरांना डावलण्यात आल्याबद्दल त्यांनी टि्वटच्या माध्यमातून आपल्या मनातील राग व्यक्त केला आहे. वीर सावरकरांच्या नशिबी पुन्हा काळे पाणी आले असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

भारतरत्न नककी कुणाला? आज नानाजी देशमुख, भुपेश हजारीका आणी प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न बनवले. वीर सावरकरांच्या नशिबी पुन्हा काळे पाणी. शेम शेम असे राऊत यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेल्या सागरा प्राण तळमळला या कवितेचा संदर्भ घेऊन विनायका प्राण तळमळला असे उपरोधिकपणे म्हटले आहे.

केंद्रात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असल्यामुळे निदान यावर्षी तरी सावरकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर होईल असे सावकरप्रेमींना वाटले होते. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतरत्न पुरस्कारांची घोषणा केली. ज्येष्ठ गायक भुपेन हजारीका, नानाजी देशमुख आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतरत्न हा देशातला सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

ज्येष्ठ गायक भुपेन हजारीका आणि नानाजी देशमुख यांनाही मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. भुपेन हजारीका यांनी त्यांचे सगळे आयुष्य संगीत आणि गाण्यासाठी वेचले. एक पहाडी आवाजाचा गायक अशी त्यांची ख्याती होती. भुपेन हजारीका हे त्यांची गाणी स्वतः लिहित आणि संगीतबद्ध करत. रुदाली या सिनेमातील दिल हूम हूम करे हे त्यांचे गाणे आजही लोकांच्या मनात रुंजी घालते आहे.

हजारीका यांना याआधी पद्मविभूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. आता त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे नानाजी देशमुख हे महाराष्ट्रातले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी समाजासाठी आयुष्य वेचले. संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंघाची निर्मिती करण्यात नानाजी देशमुख यांचा मोठा वाटा होता. पांचजन्य, राष्ट्रधर्म आणि स्वदेस या नियतकालिकांचे कामही त्यांनी काही काळ पाहिले.