* साहित्य संमेलनासाठी चिपळूण सज्ज
* दुपारी साडेतीनला उद्घाटन
* सकाळी ग्रंथदिंडी
मराठी सारस्वतांच्या महाउत्सवास अर्थात ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी चिपळूण नगरी सज्ज झाली आहे. मावळते अध्यक्ष वसंत आबाजी डहाके आणि नियोजित अध्यक्ष प्रा. डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्यासह निमंत्रित आणि संमेलन प्रतिनिधी मोठय़ा संख्येने येथे दाखल झाले आहेत.
तीन दिवसांचे हे संमेलन कोणतेही वादविवाद न होता सुरळीत आणि उत्साहात पार पडेल, असा विश्वास संयोजन समितीचे कार्यवाह प्रकाश देशपांडे यांनी व्यक्त केला. संमेलनात स्थानिक पातळीवरील विविध घटकसंस्था आणि नागरिक एकत्र काम करीत आहेत, असेही ते म्हणाले. १५० वर्षांपूर्वी लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराची स्थापना जेथून झाली तिथून सकाळी साठेआठ वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे. कवी माधव केशव काटदरे या ठिकाणी राहत होते. त्यांच्या घराजवळच कवी केशवसुत यांच्या पत्नीचे माहेर होते. ‘हरपलेले श्रेय’ ही कविता केशवसुत यांनी याच ठिकाणी लिहिली होती.  ग्रंथदिंडीमध्ये कोकणच्या संस्कृतीची वैशिष्टय़े दर्शविणारे चित्ररथही असतील. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता डहाके यांच्या हस्ते होईल. संमेलनाच्या मुख्य सभामंडपात आठ ते १० हजार रसिक बसू शकतील, अशी व्यवस्था आहे. संपूर्ण संमेलन यशस्वी करण्यासाठी २०० कार्यकर्ते व स्वयंसेवक झटत आहेत.

नितीन देसाई यांची कोकणनगरी
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी साकारलेली ‘कोकण नगरी’ संमेलनातील विशेष आकर्षण ठरत आहे. कोकणातील गावाची प्रतिकृतीच जणू देसाई यांनी साकारली असून त्यातून कोकणी संस्कृतीचे दर्शन घडत आहे. या नगरीत कोकणातल्या कोणत्याही गावात असते त्याप्रमाणे शंकराचे मंदिर असून त्याच्या आसपास अस्सल कोकणी शैलीतील घरांच्या प्रतिकृती आहेत. कोकणातील मच्छीमार समाजाचे प्रतीक म्हणून एक होडीही येथे दिसते. गावातील विहिरीसह पूर्वीच्या कोकणातील बारा बलुतेदारांचे व्यवसायही पाहावयास मिळतात. ही सर्व सजावट पर्यावरणानुकूल असून गेले महिनाभर सुमारे सव्वाशे कारागिरांनी खपून ही नगरी उभारली आहे, असे देसाई यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. ही नगरी उभारण्यासाठी सुमारे ४५ ते ५० लाख रुपये खर्च आल्याचेही ते म्हणाले.

आजचे कार्यक्रम
* सकाळी ८.३० ते १०.०० ग्रंथदिंडी
* सकाळी ११ ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन, हस्ते- वसंत आबाजी डहाके.
* दुपारी ३.०० ध्वजारोहण, हस्ते- महामंडळाच्या उपाध्यक्षा उषा तांबे.
* दुपारी ४ ते ६.३० उद्घाटन सोहळा, हस्ते- केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार.
* सायंकाळी ६.४५ ते ८.४५ निमंत्रितांचे काव्य संमेलन, अध्यक्ष- इंद्रजित भालेराव.
* रात्री ९.१५ मराठी गाण्यांचा कार्यक्रम. सादरकर्त्यां- मृदुला दाढे-जोशी.

वसिष्ठीच्या तीरावरून कुणी घर देता का घर?
साहित्य संमेलनासाठी परगावाहून आलेले प्रतिनिधी, निमंत्रित, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांच्या निवासाची व्यवस्था करताना आयोजकांची तारांबळ उडाली आहे. चिपळूण शहरातील विविध लॉज व हॉटेल्स आयोजकांनी आधीच आरक्षित केली होती. मात्र काही हॉटेलात शुक्रवारपासूनच आरक्षण झाल्याने गुरुवारी चिपळूणमध्ये थडकलेल्यांना कुठे राहायला द्यायचे, या विचाराने आयोजकांच्या उरी घरघर सुरू झाली. कशीबशी त्यांची व्यवस्था लागल्याने संयोजकांनी निश्वास टाकला.
व्यासपीठच भगवे!
 मुख्य व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. संयोजन समितीच्या या निर्णयाला प्रा. पुष्पा भावे यांनी आक्षेप घेतला होता. शरद पवार आणि स्वागताध्यक्ष सुनील तटकरे यांनी ठाकरे यांचे नाव देण्यात काहीच गैर नसल्याचा ठाम पवित्रा घेतला. त्यामुळे संमेलनाच्या प्रबोधनाचे हे व्यासपीठ कोणताही आडपडदा न ठेवता पूर्णपणे भगवे झाले.

व्यासपीठच भगवे!
 मुख्य व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. संयोजन समितीच्या या निर्णयाला प्रा. पुष्पा भावे यांनी आक्षेप घेतला होता. शरद पवार आणि स्वागताध्यक्ष सुनील तटकरे यांनी ठाकरे यांचे नाव देण्यात काहीच गैर नसल्याचा ठाम पवित्रा घेतला. त्यामुळे संमेलनाच्या प्रबोधनाचे हे व्यासपीठ कोणताही आडपडदा न ठेवता पूर्णपणे भगवे झाले