वाई पोलीस ठाण्यात नेमणुकीस असणाऱ्या करोनाबाधित पोलिस आणि त्यांच्या कुटुंबाला पाचवड येथील घरी विलगीकरणात राहण्यास मज्जाव करणाऱ्या तिघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच संबंधितांवर कडक कारवाईचे आदेश साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत.

वाई पोलीस ठाण्यात एकाच वेळी सोळा पोलीस कर्मचारी व त्यांचे नातेवाईक करोनाबाधित झाल्याने जिल्हा पोलिसांत खळबळ माजली होती. यातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून इतरांवर उपचार सुरू आहेत. एका पोलीस कर्मचाऱ्याला त्याची पत्नी व चार वर्षांच्या मुलीसह उपचारानंतर करोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यांना पुढील चौदा दिवस होम क्वारंटाइनसाठी पाचवड येथील गणेश कॉलनी जवळ घऱाजवळ सोडले आणि रुग्णवाहिका निघून गेली. त्यानंतर इमारतीच्या दरवाज्याला कुलूप असल्याचे पाहून त्यांनी इमारतीचा दरवाजा उघडण्याची विनंती केली. परंतू वीस मिनिटे त्यांना इमारती बाहेरच उभे करण्यात आले. खूप विनंत्या केल्यानंतर कुलूप काढून त्यांना प्रवेश देण्यात आला. त्यांची चार ऑगस्टला विलगीकरणाची मुदत संपणार आहे.

दरम्यानच्या कालावधीत त्यांना स्थानिकांनी मारहाणीची धमकी दिल्याने व त्रास देण्याचा प्रकार दोन तीन दिवस सुरु राहिल्याने त्यांनी याबाबत लेखी तक्रार पोलीस अधीक्षक व तीन दिवसांनी आपले सरकार पोर्टलवर दिली. पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून पोलीस अधीक्षकांनी या तिघांवर कडक कारवाईचे आदेश दिले.