सत्तेत राहायचे आणि विरोधही करायचा. ही दोन दगडावर पाय ठेवण्याची वृत्ती शिवसेनेने थांबवावी आणि अर्धनारी नटेश्वराची भूमिका बंद करावी अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा टीका केली. अहमदाबाद, गुजरातचे महत्त्व वाढवण्यासाठी बुलेट ट्रेन आणली जात आहे. एवढया पैशात सर्व शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सुटला असता असेही त्यांनी म्हटले आहे.

हल्लाबोल आंदोलनातील सातव्या दिवसाची शेवटची जाहीर सभा रविवारी साताऱ्यात पार पडली. या सभेत अजित पवारांनी शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेचा चांगलाच समाचार घेतला. दोन दगडावर पाय ठेवण्याची वृत्ती शिवसेनेने थांबवावी, असे त्यांनी सांगितले. भाजपावर टीका करताना अजित पवार म्हणाले, भाजपाच्या राज्यात एकही समाज समाधानी नाही. या साताऱ्याने साहेबांना खूप प्रेम दिलं म्हणून या भागाची कधीच अडचण होवू नये अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आघाडी सरकार असताना अनेक योजना या भागासाठी आम्ही आणल्या. मात्र हे सरकार काही करत नाही, असे त्यांनी सांगितले. या सरकारने मोठमोठया उद्योगपतींचे कर्ज माफ केले. मात्र आमच्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जात नाही. शेतकरी मोडकळीस आला आहे मात्र सरकार त्याची दखल घेत नाही, असे त्यांनी नमूद केले.

मुंबईत तरुणांनी रेल्वे रोको आंदोलन केले होते. सरकारने थातुरमातुर उत्तर दिले. ते तरुण आजही नाराज आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अहमदाबाद, गुजरातचे महत्त्व वाढवण्यासाठी बुलेट ट्रेन आणली जात आहे. एवढया पैशात सर्व शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सुटला असता, असे त्यांनी सांगितले.

सोशल मीडियाचा वापर करून भाजप सत्तेत आला पण आता हेच सोशल मीडिया अडचणीचं ठरत आहे. तरुण वर्ग आज म्हणत आहे की, आमच्या मागच्या पिढीने भाजपला मतदान का केले नाही ते आज कळले, असेही पवारांनी म्हटले आहे. शिवसेना आणि अजित पवार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाकयुद्ध सुरु असून आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होत जाणार, असेच दिसते.