“चिनी वस्तूंवर बहिष्कार टाका अशी मोहीम भाजपा एकीकडे राबवत आहे आणि दुसरीकडे चीनमध्ये उत्पादित झालेल्या मोबाईल वरून छायाचित्रे काढून ती समाज माध्यमातून प्रसारित केली जातात. हा भाजपाचा दुटप्पीपणा आहे. चीनच्या वस्तू वापरायच्या की नाही याबाबत केंद्र शासनाने लेखी स्वरूपात स्पष्टीकरण दिले पाहिजे. केंद्रात व राज्यात चीनच्या माध्यमातून अनेक मोठे प्रकल्प राबवले जात आहेत. केंद्र शासनाची भूमिका स्पष्ट झाल्याशिवाय याबाबत राज्य शासनाला काहीच निर्णय घेता येत नाही”, असे म्हणत गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी चिनी वस्तू बहिष्कार मोहिमेवर टीका केली.

गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या हल्ल्यात भारतीय सैन्य शहीद झाले. या वीर जवानांना अभिवादन करण्यासाठी कोल्हापुरात काँग्रेस पक्षाच्यावतीने विरोधात मूक निदर्शने करण्यात आली. यावेळी सतेज पाटील बोलत होते. “देशाचे परराष्ट्र धोरण अडचणीत आले आहे, असा आरोप करून मंत्री पाटील म्हणाले, महाराष्ट्रात अनेक मोठे प्रकल्प चीनच्या सहकार्याने राबवले जात आहेत. ते सुरू ठेवायचे की बंद करायचे याबाबत राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी केंद्र शासनाकडे लेखी स्वरूपात खुलासा करण्याची मागणी केली आहे. याबाबत केंद्रशासन काहीच स्पष्टीकरण देत नाही. राजकीय स्वरूपाच्या वक्तव्यांचा शासकीय कामकाजात काही उपयोग होत नाही. केंद्र शासनाची चीनच्या विरोधातील भूमिका खरी आहे की खोटी याचे धोरण स्पष्ट झाले पाहिजे. याबाबत केंद्र शासन बोटचेपी भूमिका घेत आहे”, असा आरोपही त्यांनी केला.