सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गेले दोन महिने कोसळणाऱ्या पावसामुळे नदी-नाले, धरणे, विहिरी, शेततळींना उपयुक्त पाण्याची पातळी गाठली गेली आहे. जिल्ह्य़ातील लहान-मोठी २५ धरण प्रकल्पांनी पातळी गाठली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात १ जूनपासून आजपर्यंत कोसळलेला पाऊस सरासरी २८००.६२ मि.मी. एवढा आहे. जिल्ह्य़ातील मोठी-मध्यम व लघुपाटबंधारे प्रकल्प १०० टक्के पाण्याने भरली आहेत.

आंबोली मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या क्षेत्रात चार हजार २६१ मि.मी. एवढय़ा पावसाची नोंद झाली आहे. जिल्हय़ात सर्वाधिक पाऊस आंबोलीत कोसळला हे त्यानिमित्ताने उघड झाले आहे. आंबोली धरण शंभर टक्के भरले आहे.

जिल्ह्य़ात तिलारी जलविद्युत प्रकल्पासह २४ मध्यम-लघुपाटबंधारे प्रकल्प पाण्याने भरले आहेत. गतवर्षी ५४० दशलक्ष घनमीटर पाण्याने भरलेले प्रकल्प यंदा ७७० दशलक्ष घनमीटर पाण्याने शंभर टक्के भरले आहेत.

तिलारी जलविद्युत प्रकल्प शंभर टक्के भरले असून, ८५ टक्के पाणी उपयुक्त आहे. या शिवाय शंभर टक्के भरलेल्या धरणात शिरवळ, माडखोल, कारीवडे, शिवडाव, नाधवडे, आंबोली, वाघोटी, हातेशी, निळेली, सनमटेंब व अन्य धरणांचा समावेश आहे. या लघुपाटबंधारे प्रकल्पाशिवाय विहिरी, जलशिवाय योजना, शेततळी, नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. यंदाचा पाऊस भूगर्भातील पातळी वाढविणारा ठरेल असा अंदाज आहे.

जिल्हय़ात आठही तालुक्यांत समाधानकारक पाऊस कोसळला असला तरी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ योजना शासनाने हाती घ्यावी. त्यामुळे आणखी कोसळणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.