अकलूज येथे रात्री उशिरा रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी सत्यशील मोहिते-पाटील यांच्यासह दहा जणांविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सत्यशील हे राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे आहेत.
अकलूज पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक कोरके हे आपल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसह मंगळवारी रात्री उशिरा अकलूज येथे रस्त्यावर गस्त घालत निघाले होते. त्या वेळी कोरके यांनी सत्यशील मोहिते-पाटील यांना हटकले आणि समज दिली. त्यातून दोघांत शाब्दिक बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान सत्यशील मोहिते यांनी सहायक पोलीस निरीक्षक कोरके यांना धक्काबुक्की करण्यात झाले. या प्रकरणी सत्यशील मोहिते-पाटील यांच्यासह दहा जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सत्यशील यांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.