रत्नागिरी : करोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ  नये म्हणून दापोली तालुक्यातील हर्णे येथील एन. डी. गोळे हायस्कूल या शाळेने शासनाचे सर्व नियम पाळून ‘शाळा आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे.

करोनाच्या प्रादूर्भावामुळे सध्या शाळा—महाविद्यालये बंद आहेत. त्यावर उपाय म्हणून काही ठिकाणी ऑनलाईन अध्यापन चालू आहे. परंतू ग्रामीण भागामध्ये कोणत्याही प्रकारचे नेटवर्क नसलेल्या परिसरातील विद्यार्थ्यांपर्यंत त्याही माध्यमातून पोचता येत नाही. हर्णे गावामध्येही ही समस्या आहे. गेल्या ३ जूनला झालेल्या ‘निसग’ वादळामुळे आयडिया व व्होडाफोन कंपनीचा टॉवर पूर्णपणे कोसळला. त्यामुळे गावांमधील मोबाईल फोनची रेंज गेली. त्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी रेंज काही प्रमाणात आली. पण तीसुद्धा नीट नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत होते.

ही अडचण दूर करण्यासाठी हर्णे विद्यामंदिर हर्णे संस्था, शालेय समिती आणि एन डी गोळे हायस्कूल यांनी एकत्रित बैठक घेऊन ‘शाळा आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला. शिक्षकांनी सर्व वाडय़ा, पेठा, मोहल्लय़ाच्या पदाधिकाऱ्यांना पत्र पाठवून गावातील सभागृह किंवा मंदिराच्या सभामंडपात विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्याची परवानगी मागितली. त्याप्रमाणे पदाधिकारी व पालकांनी सहमती दिली. त्यानुसार सर्व शिक्षक आळीपाळीने प्रत्येक वाडी मोहल्लय़ामध्ये जाऊन सॅनिटायजर, मास्कचा वापर करून, तसेच शारीरिक अंतर राखून मुलांना शिकवत आहेत. यावेळी मुलांनी केलेला अभ्यास पाहणे, अभ्यासबाबत त्यांना मार्गदर्शन करणे, शंका निरसन करणे इत्यादी गोष्टी केल्या जात आहेत. शाळेचे मुख्याध्यापक तानाजी लेंडवे यांच्यासह अशोक साळुंखे, महेंद्र सागवेकर, प्रवीण देवघरकर, प्रशांत गुरव, संदीप क्षीरसागर, श्रद्धा शिंदे आणि मनीषा जोशी हे शिक्षक या उपक्रमामध्ये सहभागी झाले आहेत.

दरम्यान, या उपक्रमाद्वारे शिक्षक आणि विद्यर्थ्यांंमध्ये चांगल्या प्रकारे संवाद साधला जात आहे. मुलांच्या समस्यांचे निरसन करता येत आहे. त्यामुळे संपूर्ण शाळा सुरू होईपर्यंत तो चालू राहील, असे मुख्याध्यापक तानाजी लेंडवे यांनी सांगितले.