करोनाच्या उद्रेकामुळं स्थगित करण्यात आलेल्या राज्यातील शाळा अखेर नऊ महिन्यांनंतर सोमवारपासून सुरु झाल्या. नागपूरमध्ये ९ वी आणि १० वीच्या वर्गातील विद्यार्थांसाठी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. करोनाचं संकट अद्यापही संपलं नसल्याने संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने शाळांमध्ये नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे.

शाळांमध्ये गर्दी होऊन संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होऊ नये म्हणून शासनाने केवळ ९ वी आणि १० वीचेच वर्ग सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यातही फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करणे बंधनकारक असून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शरिराच्या तापमानाची नोंदही केली जात आहे. वर्गात प्रत्येक बाकावर एकच विद्यार्थ्याला बसण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रत्येकाच्या तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आलं आहे.

दरम्यान, “प्रशासनानं घालून दिलेल्या नियमावलींचे आम्ही योग्य प्रकारे पालन करण्याचा प्रयत्न करु,” असं या शाळेच्या मुख्याध्यापकांनी म्हटलं आहे.