धुंदलवाडी आश्रमशाळेत १४९ विद्यार्थ्यांचीच उपस्थिती

कासा : डहाणू व तलासरी परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के बसत असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. धुंदलवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनीही शाळेकडे भूकंपाच्या भीतीने पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. प्रशासनानेदेखील भूकंपाच्या भीतीने इमारतीबाहेर मोकळ्या जागेवर शाळा सुरू केली आहे.

शिक्षण प्रसारक मंडळ संचालित धुंदलवाडी येथे निवासी आश्रमशाळा असून ४०० निवासी विद्यार्थ्यांसह ५७९ विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. भूकंपाचे धक्के सातत्याने बसत असल्याने विद्यार्थ्यांनीही कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करण्याचे धोरण अवलंबले असून बहुतेक विद्यार्थ्यांनी शाळेत येणेच बंद केले आहे. ५७९ पैकी केवळ १४९ विद्यार्थीच शाळेत उपस्थित राहत आहेत. दहावीची परीक्षा जवळ आल्याने करायचे काय? असा प्रश्न शाळा प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

पालकही भूकंपाच्या भीतीने मुलांना शाळेत पाठविण्यास तयार होत नाहीत. खबरदारी म्हणून शाळेतील अधिकतर वर्ग इमारतीबाहेर मोकळ्या जागेवर भरवले जात आहेत. शाळेच्या इमारतीच्या व्हरांडय़ात, शाळेबाहेर झाडाखाली वर्ग भरवले जात आहेत.

डहाणू तालुक्यातील पूर्वेच्या भागात असलेल्या धुंदलवाडी परिसरात नोव्हेंबर महिन्यापासून भूकंपाचे धक्के बसू लागले आहेत. या भागात आतापर्यंत चौदा-पंधरा मोठे धक्के जाणवले असले तरी दररोज कमी तीव्रतेचे लहान धक्के बसणे कायम आहे. भूगर्भातून विचित्र आवाज येणे आणि कमी तीव्रतेचे कंप जाणवत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अजूनही या भागातील आदिवासी उघडय़ावर तात्पुरत्या बांधलेल्या ताडपत्रीच्या झोपडय़ांमध्ये निवास करताना दिसून येत आहे.

भूकंपाचे धक्के या भागात बसू लागल्याने दिवाळीच्या सुटीनंतर या आश्रमशाळेतील विद्यार्थी शाळेत परतलेच नाहीत. अखेर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ  नये म्हणून शाळेने दिनक्रमही बदलला आहे. या विद्यार्थ्यांना दररोज आपल्या घरून ये-जा करण्याची मुभा शाळा व्यवस्थापनाने करून दिली. विद्यार्थी सकाळी लवकर घरून आल्यानंतर त्यांना नाश्ता, शिक्षणासोबत दुपारचं जेवण व संध्याकाळचा नाश्ता करून पुन्हा आपल्या घरी पाच ते सहा किलोमीटर चालत जाताना दिसत आहेत, अशी परिस्थिती आहे.