वर्गखोल्यांची झाडलोट, सामाजिक अंतर, हात र्निजतुकीकरण व्यवस्था अखेरच्या टप्प्यात

लोकसत्ता वार्ताहर

कासा:  शालेय शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी मागच्या महिन्यापासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत त्याच प्रमाणे २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश काढले आहेत त्यामुळे डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी या जिल्ह्यंच्या ग्रामीण आदिवासी भागात शाळांमध्ये पूर्व तयारीची लगबग पहावयास मिळत आहे.

गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून बंद असलेल्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांनी शाळा पूर्व तयारीची सुरुवात केलेली आहे. बरेच महिने वर्गखोल्या बंद असल्याने वर्गखोल्यांची स्वच्छता तसेच करोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा र्निजतुकीकरण करणे शाळेमध्ये हात धुण्याची सोय करणे या बाबीवर काळजीपूर्वक लक्ष दिले जात आहे. पालघर जिल्ह्यमधील डहाणू, विक्रमगड, तलासरी, जव्हार, मोखाडा या आदिवासी दुर्गम भागात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार असल्याने या प्रकारची तयारी करताना शालेय प्रशासन दिसत आहे.

वर्गखोल्यांमध्ये सामाजिक अंतर राखणे, हात धुवण्याची सुविधा, मुखपट्टी आदींबाबत शाळा प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू आहे. त्याच बरोबर शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक लसीकरण होणार असून आरोग्य प्रशासनाची सुद्धा धावपळ सुरू आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याविषयी पालकांमध्ये विविध स्तरावर जनजागृती सुरू असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. अनेक शाळांमध्ये शुक्रवारी नियोजन बैठकीचेही आयोजन करण्यात आले आहे.

२७ जानेवारी २०२१ रोजी पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश आल्यामुळे आणि सर्व शालेय वर्ग र्निजतुकीकरण करत आहोत. तसेच सामाजिक अंतर ठेवून विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन करत आहोत.
– विक्रम दळवी (जिल्हा परिषद शिक्षक)

पालकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी शिक्षकांनी वैयक्तिक संपर्क  साधला असून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.