मुंबई (जुहू चौपाटी) ते नगर (मुळा धरण) या ‘सी-प्लेन’ प्रवासी सुविधेला अखेर मुहूर्त लागला आहे. येत्या दि. १९ ला ही सेवा सुरू होणार असून, त्याद्वारे नगरहून ४५ मिनिटांत मुंबई गाठता येईल, मात्र त्यासाठी साडेपाच हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
मेरीटाइम डेली सव्‍‌र्हिसेस व राज्य पर्यटन महामंडळ (एमटीडीसी) यांनी संयुक्तपणे ही सेवा सुरू केली आहे. कंपनीच्या सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. मुंबई ते पवना या सेवेच्या यशस्वी प्रारंभानंतर आता जिल्हय़ातील सर्वात मोठय़ा मुळा धरणाच्या ज्ञानसेश्वरसागर जलाशयावरून नगर ते मुंबई या हवाईमार्गाची ‘सी-प्लेन’ सुविधा सुरू करण्यात येणार आहे. मुळा धरणाच्या जलाशयात त्यासाठी खास धक्का (फलाट) बांधण्यात आला आहे. धरणाच्या भिंतीपासून दीड किलोमीटर अंतरावर पाण्यात उभारण्यात आलेल्या या फलाटावर विमान उतरेल व उड्डाणही करेल. या फलाटापर्यंत पोहोचण्यासाठी कंपनीने सौरऊर्जेवरील बोटींची व्यवस्था केली आहे. धरणाच्या काठावरून या बोटीतून फलाटापर्यंत पोहोचवण्यात येईल.
या मार्गाने नगर ते मुंबई प्रवास ४५ मिनिटांत होणार आहे. त्यासाठी नऊ आणि एकोणीस प्रवासी क्षमतेची विमाने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन त्यानुसार विमान ठरेल. नगर ते मुंबई अशा दररोज दोन फेऱ्या करण्यात येणार असून, मुंबईत जुहू चौपाटीवरून ही विमाने नगरसाठी उड्डाण करतील. मुळा धरणावर हे विमान २० मिनिटे थांबणार असून त्यानंतर ते पुन्हा परतीच्या प्रवासाला निघेल. नगर ते मुळा धरण हे अंतर ३० किलोमीटर असून शिर्डी ते मुळा धरण हे अंतर सुमारे ७० किलोमीटर आहे. कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर या शहरांनाही या सेवेसाठी फारसा त्रास घ्यावा लागणार नाही. मुळा धरण ते जुहू या प्रवासासाठी ५ हजार ४९९ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.
मूळच्या मलेशियन असलेल्या या कंपनीने गेल्या मार्चमध्येच मुळा धरण ते जुहू चौपाटी अशा ‘सी-प्लेन’ प्रवासाची यशस्वी चाचणी घेतली होती. गेल्या दोन वर्षांपासून कंपनीची तयारी सुरू होती, तेव्हापासून जिल्हय़ात याबाबत उत्सुकता होती. या सुविधेमुळे शिर्डी तसेच जिल्हय़ातील अन्य देवस्थान, पर्यटनस्थळे मुंबईच्या जवळ येणार आहेत. नजीकच्याच काळात शिर्डी येथील विमानतळाचेही काम पूर्ण होईल, मात्र तत्पूर्वीच ही सेवा सुरू होत आहे. दोनतीन वर्षांच्या खंडानंतर यंदा मुळा धरणही पूर्ण क्षमतेने भरण्याच्या टप्प्यात असून २६ टीएमसी क्षमतेचे हे धरण सध्या ९४ टक्के भरले आहे. कंपनीने पुढच्या टप्प्यात जुहू ते गंगापूर, जुहू ते गणपतीपुळे या मार्गावरही ही सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे.