देवरुख नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या अपहरणप्रकरणी अटक टाळण्यासाठी फरारी असलेल्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांची यंदाची दिवाळी अज्ञातवासातच गेली आहे.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील भाजपा उमेदवार नीलेश भुरवणे, पक्षाचे शहराध्यक्ष कुंदन कुलकर्णी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल भुवड यांचे अपहरण केल्याचा गुन्हा जिल्हाप्रमुख महाडिक यांच्यासह नगर पंचायत सदस्य मंगेश शिंदे, मनीष सावंत, बंडय़ा बोरुकर, अजित ऊर्फ छोटय़ा गवाणकर इत्यादींविरुद्ध नोंदवण्यात आला आहे. त्यापैकी शिंदे व सावंत यांना लगेच अटक करून न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. त्यांची कोठडीची मुदत संपल्यामुळे दिवाळीच्या पूर्वसंध्येला जामिनावर मुक्तताही झाली. पण महाडिक यांच्यासह बोरुकर व गवाणकर अटक टाळण्यासाठी फरारी झाले असून त्यांच्यातर्फे जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. न्यायालयाने तो नुकताच फेटाळला असल्यामुळे आता उच्च न्यायालयाकडून जामीन मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत. सध्या न्यायालयाला दिवाळीची सुट्टी आहे. त्यामुळे हे तिघेही जण पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी अज्ञातवासात गेले आहेत.
जिल्हा सेनाप्रमुख महाडिक यांचा गेल्या आठवडय़ात सुवर्णमहोत्सवी वाढदिवस होता. त्या दृष्टीने भव्य कार्यक्रमांची आखणी सुरू होती. पण या अपहरण प्रकरणामुळे उत्सवमूर्तीच गायब आहेत.