राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे.

अशा प्रकारे खासदाराच्या विरोधात आमदाराने हक्कभंगाचा प्रस्ताव देण्याचा प्रकार राज्यात पहिल्यांदाच होत आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे आमदार—खासदार या निमित्ताने एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे  खासदार तटकरे दापोली विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या विकासकामांच्या भूमीपूजन कार्यक्रमांना आपल्याला निमंत्रण देत नाहीत. तसेच आपल्याला विश्वासात न घेता कार्यक्रम करत असल्याचे कारण देत आमदार कदम यांनी हा प्रस्ताव दिला आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, माझ्या मतदारसंघात खासदार तटकरे मला डावलून विविध शासकीय कार्यक्रम घेत आहेत. गेल्या १२ ऑक्टोबर रोजी मला निमंत्रण न देता त्यांनी दापोली येथील पंचायत समिती सभागृहात शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.

म्हाप्रळ ते आंबेत दरम्यान फेरी बोट सेवा सुरू करण्यासाठी दोन्ही बाजूला फेरीबोट लावण्यात येणार आहे. या जेटीचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून निधीही मंजूर झाला. या कामाचा कार्यादेश (वर्क ऑर्डर) देण्याअगोदरच सुनील तटकरे, त्यांचे चिरंजीव आमदार अनिकेत तटकरे व माजी आमदार संजय कदम यांना घेऊन या कामाचे भूमिपूजन केले. या कार्यक्रमाचे मला निमंत्रणही देण्यात आले नाही. तसेच या भूमिपूजनाच्या पाटीवर माझे नाव न टाकता खासदार महोदयांनी राष्ट्रवादी पक्षाचाच भूमिपूजन कार्यक्रम केला आहे, असा आरोप कदमांनी केला.

ही बाब अतिशय गंभीर असून माझ्या हक्कावर गदा आणण्याचे काम खासदार तटकरे सातत्याने करत आहेत. त्यामुळे नाइलाजाने आपण २० ऑक्टोबर रोजी विधानसभा अध्यक्ष पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. तटकरे यांच्यावर पुढील योग्य कारवाई करण्याची विनंती केली असल्याची माहिती कदम यांनी दिली.

पंचायत समितीच्या बैठकीला आमदार कदम का उपस्थित नाहीत, अशी विचारणा तटकरे यांना त्या वेळी केली असता, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते आले नसल्याचे तटकरे यांनी पत्रकारांना सांगितले होते. तसेच जिल्हा तसेच स्थानिक पातळीवर तिन्ही राजकीय पक्षांमध्ये समन्वय होईल या दृष्टीने आपला प्रयत्न राहणार आहे. तिन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींना, तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत कामे मार्गी कशी लावायची, हे येत्या काही दिवसात ठरविण्यात येईल, असे वक्तव्य तेव्हा तटकरे यांनी केले होते. मात्र ते ठरायच्या आधीच कदमांनी हा प्रस्ताव दिला आहे.

या प्रकारामुळे आता महाविकास आघाडीतच बिघाडी होण्याची शक्यता आहे. आता दोन्ही पक्षाचे नेते या संदर्भात कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रायगड व रत्नागिरी जिल्हे जोडणारा आंबेत पूल कमकुवत झाल्यामुळे या पुलावरून जड वाहने नेण्यास मनाई करण्यात आली असल्याने या पुलाच्या पुनर्बाधणीसाठी आपण प्रयत्न केले. पण राज्यमंत्री आदिती तटकरे यांनीही संबंधित अधिकाऱ्यांच्या या पुलासंदर्भात बैठका घेतल्या, याबाबतही आमदार कदम यांचा आक्षेप आहे.