काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात वांगी येथे अंत्यसंस्कार झाले. शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा अंत्यविधी पार पडला. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी तसेच अंत्यविधी वेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी राज्याच्या राजकारणातील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती.

मुंबईतील लीलावती रूग्णालयात शुक्रवारी (९ मार्च) रात्री कदम यांचे निधन झाले. त्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी त्यांचे पार्थिव पुण्यातील त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. पुढे अंत्ययात्रेद्वारे धनकवडी येथील भारती विद्यापीठात ते नेण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. त्यानंतर एका खासगी हेलिकॉप्टरद्वारे पतंगराव कदम यांचे पार्थिव सांगलीतील वांगी येथे आणण्यात आले. सोनहिरा साखर कारखाना परिसरात संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, पुण्यातील सिंहगड या निवासस्थानी पतंगराव कदम यांचे पार्थिव आणण्यात आल्यानंतर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी खासदार सुरेश कलमाडी, खासदार श्रीरंग बारणे यांनी या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. आमदार प्रणिती शिंदे, डॉ. के. एच. संचेती, डॉ. विश्वनाथ कराड, बुधाजीराव मुळीक, विद्या येरवडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, उल्हास पवार, विठ्ठल मणियार, आमदार जगदीश मुळीक, अभय छाजेड, अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी पतंगराव कदम यांच्या अंत्यसंस्कारासाठी गर्दी केली होती. तसेच अनेक कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी केली होती.