संकलनाची स्वतंत्र व्यवस्थाच नाही

वसई: वसई-विरार शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांना खाटा व इतर सुविधा उपलब्ध होत नसल्याने काही करोनाबाधित रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत. परंतु या रुग्णांचा कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गृहविलगीकरणात उपचार सुरू असलेल्या करोना रुग्णांचा कचरा नेमका कुठे जातो, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

करोनाचा जैववैद्यकीय कचरा हा स्वतंत्र गोळा करून त्याची तातडीने विल्हेवाट लावण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. यानुसार करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी तयार केलेल्या करोना केंद्रातून हा कचरा गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी नेला जातो. परंतु जे रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेतात त्यांच्या कचऱ्याचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून वसई-विरार शहरात करोना रुग्णांची संख्या ही झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे करोनावर उपचार करणारी करोना उपचार केंद्र, खासगी रुग्णालये आदी सर्व भरून गेली आहेत. त्यामुळे ज्या बाधित रुग्णांना लक्षणे नाहीत व त्यांच्या घरी ते स्वत:चे विलगीकरण करून राहू शकतात अशा रुग्णांना गृहविलगीकरणाचा पर्याय आहे. त्यामुळे बहुतांश करोनाबाधित रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत.

सद्यस्थितीत वसईच्या शहरी भागात एप्रिल महिन्यात आतापर्यंत १८ हजार ४०५ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत ११ हजार २३ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यातील ६ हजार ७४७ रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत. परंतु या गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या उपचारादरम्यान जो कचरा निघतो तो कचरा स्वतंत्र गोळा करण्यासाठी पालिकेची व्यवस्था नाही.  कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करताच हा कचरा एकत्रित होत असल्याने यामुळे करोनाच्या संसर्गाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात वसई-विरार शहराची पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यामार्फत स्वच्छता केली जाते. महापालिकेत ३ हजारांहून अधिक सफाई कर्मचारी आहेत. विविध भागांत सफाई कामगारांमार्फत शहरातून तयार होणारा कचरा याची स्वच्छता करून जमा करून कचराभूमीपर्यंत नेण्याचे काम केले जात आहे. यातच आता गृहविलगीकरणात तयार होणारा करोनाचा जैविक कचरा ही नियमित कचऱ्यात टाकला जाऊ लागला आहे. यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट लावताना नकळत या कचऱ्यापासून करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे.