लॉकडाउनच्या काळात आधीच शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असताना आता नव्या हंगामात बोगस बियाणं विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होऊन शिक्षा होईल तसेच ज्यांनी हे नुकसान केलंय त्यांच्याकडून नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिली आहे. रविवारी जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधताना ते बोलत होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून मराठवाडा, विदर्भ या भागातील काही ठिकाणांवरुन बोगस बियाणांबाबत तक्रारी आलेल्या आहेत. याची गंभीर दखल आपण घेतली आहे, हे दुर्देवी आहे. शेतकऱ्यांची अवस्थाही सर्वांच्या सारखीच झालेली आहे. आपण लॉकडाउनमध्ये घरी असताना जो शेतकरी न थकता आपल्यासाठी मेहनत करतोय, घाम गाळतोय त्या शेतकऱ्यासोबत आपण आहोत.”

“मी शेतकरी दादांना सांगू इच्छितो की, तुम्ही काळजी करु नका हे सरकार तुमचं आहे ज्याने ज्याने तुम्हाला फसवलेलं आहे ते कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत. त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करुन सजा तर होईलच पण तुमचं जे जे नुकसान झालं आहे, ज्यांनी ते केलं आहे त्यांच्याकडून हे सरकार तुम्हाला नुकसान भरपाई सुद्धा मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

कर्जमुक्त योजनेतून मागे राहिलेल्यांना लवकरच कर्जमुक्त करणार

शेतात मर मर मरुन, राबून शेतकऱ्यांनी जे बियाणं पेरलं ते उगवलंच नाही. त्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट आलं, आता यासाठी पैसा आणायचा कुठून असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. तसंही शेतकऱ्यांच बरचंस कर्ज आपण उतरवलं आहे. तसेच कर्जमुक्ती योजनेचा फायदा घेण्यापासून स्थानिक निवडणुका, त्यानंतर करोनाच्या संकटामुळं काही लाख शेतकरी वंचित राहिले आहेत. मात्र, आता या उरलेल्या शेतकऱ्यानाही कर्जमुक्त करायचं आपण ठरवलं आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.