पोलीस यंत्रणेची कसोटी, १३ लाख भाविक दाखल
कुंभमेळ्यात रविवारी होणाऱ्या दुसऱ्या शाही पर्वणीसाठी लाखो भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल होत असताना पूर्वसंध्येला झालेल्या मुसळधार पावसामुळे जनसागराचे व्यवस्थापन करताना पोलीस यंत्रणेची कसोटी लागली आहे. श्रावणी अमावस्येच्या पाश्र्वभूमीवर, शनिवारी सकाळपासून लाखो भाविकांनी रामकुंड व कुशावर्त तीर्थावर स्नानाचा योग साधण्यास सुरूवात केली. भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढत असतानाच दुपारी विजांच्या कडकडाटासह दीड तास पावसाने नाशिकला झोडपले. यामुळे शहरातील बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले. गोदावरीच्या पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे अर्धा तास रामकुंडावर स्नानास प्रतिबंध करण्यात आला. दरम्यान, काळात गंगापूर धरणातील विसर्ग थांबविण्यात आला. साधुग्राममध्ये साधू-महंतांच्या शामियान्यात पाणी शिरून धान्य व इतर सामग्रीचे नुकसान झाले. भाविकांचे कमालीचे हाल झाले.
जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभमेळ्यातील दुसऱ्या शाही पर्वणीसाठी देशभरातील भाविकांचा ओघ कुंभ नगरीकडे सुरू आहे. आदल्या दिवशी रेल्वे, रस्ता मार्गे जवळपास १० लाख भाविक नाशिकमध्ये, तर तीन लाख भाविक त्र्यंबकमध्ये दाखल झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. रविवारी पर्वणीच्या दिवशी हा आकडा उच्चांकी पातळी गाठेल, अशी स्थिती आहे. पहिल्या पर्वणीत लोखंडी जाळ्या आणि वाहतुकीवर र्निबध लादल्याने भाविकांची पायपीट आणि शहरवासीयांना स्थानबध्द रहावे लागल्याची ओरड झाली. यामुळे नियोजनात फेरबदल करत ही पर्वणी सुसह्य़ करण्याकरीता प्रयत्न करण्यात आले. शनिवारी सकाळपासून नाशिकचे रामकुंड व त्र्यंबकच्या कुशावर्त तीर्थावर हजारो भाविकांचे स्नान सुरू झाले. दुपारी जवळपास दोन तास झालेल्या पावसाने शहरातील बहुतांश रस्ते व मुख्य चौक पाण्याखाली गेले. अनेक रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहत असल्याने काही मार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद करावी लागली. बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला. गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे रामकुंड व परिसरातील घाटांवरील स्नान अर्धा तास थांबविण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून पर्वणीसाठी गंगापूर धरणातून सोडलेले पाणी थांबविण्यात आले. नदी काठावरील टाळकुटेश्वर परिसरातील रस्ता वाहून गेला. साधुग्राममध्ये पाणी शिरल्याने साधू-महंतांची
तारांबळ उडाली.
अनेक खालशांचे अन्नधान्य व सामग्री भिजल्याने मोठे नुकसान झाले. भाविकांची आडोसा शोधताना दमछाक झाली. हजारोंनी उड्डाण पुलाखाली आश्रय घेत बचाव केला. काही घरांची पडझड झाली. इमारतींच्या तळघरात पाणी साचले. पावसाच्या पाण्यामुळे वाहून आलेल्या पाणवेली व कचरा हटविण्यासाठी यंत्रणा रात्री उशिरापर्यंत शर्थ
करीत होती.

त्र्यंबकमध्ये दर्शनासाठी रांगा
नाशिकच्या तुलनेत त्र्यंबक येथे पावसाचे प्रमाण कमी होते. त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी भाविकांच्या तीन ते चार किलोमीटपर्यंत रांगा लागल्या. सायंकाळी देवस्थानने रात्री आठपर्यंत दर्शन खुले राहील असे जाहीर केल्यामुळे संतप्त भाविकांनी वाद घातला. पाऊस थांबल्यानंतर रामकुंडावर भाविकांचे स्नान सुरू झाले. त्र्यंबक नगरीत आदल्या दिवशी सुमारे तीन लाख भाविक दाखल झाल्याचे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले.