29 September 2020

News Flash

मुख्यमंत्र्यांची माढय़ात बोटीतून दुष्काळाची पाहणी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यातील शीतयुद्ध सर्वश्रुत. हे दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

| June 15, 2013 01:49 am

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यातील शीतयुद्ध सर्वश्रुत. हे दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्याचा प्रत्यय शुक्रवारी पवार यांच्या येवला दौऱ्यातील कार्यक्रमात आला. काही दिवसांपूर्वी माढा या पवार यांच्या लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीची मुख्यमंत्र्यांनी केलेली पाहणी या वेळी पवार यांच्या टीकेचे लक्ष्य बनली.
‘मुख्यमंत्री महोदयांनी बोटीतून भ्रमंती करत दुष्काळी स्थितीची पाहणी केली,’ असा टोला पवार यांनी या कार्यक्रमात लगावला. मतदारसंघात वळवाचा पाऊस झाल्यामुळे बंधारा पाण्याने भरला होता. स्थानिक आमदाराने मग मुख्यमंत्र्यांना बोटीतून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करवून आणली, असे त्यांनी नमूद केले.
येवला तालुक्यात विविध विकास कामांचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित छोटेखानी सभेत ते बोलत होते. या वेळी पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर माढा दौऱ्यावरून शरसंधान साधण्याची संधी सोडली नाही. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी माढा परिसरात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्या वेळी स्थानिक आमदाराने त्यांना बोटीतून भ्रमंती घडवून आणली.
हा धागा पकडून पवार यांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या विकास कामांची जंत्री सादर केली. दुष्काळी परिस्थितीत समाजमंदिर वा तत्सम कामांसाठी मागणी केली जाते. तथापि, आजपर्यंत या स्वरूपाच्या कामांसाठी आपण कधी निधी दिलेला नाही आणि देणारही नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. आपला दरवर्षीचा खासदार निधी पूर्णपणे जलसंधारणाच्या कामांवर खर्च करण्यात आला. या माध्यमातून गतवर्षी १९००, तर या वर्षी ११०० बंधारे मतदारसंघात बांधण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. दुष्काळी भागातील बंधारे व तळ्यांमधील गाळ काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राबविलेल्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. सलग तीन वर्षे या पद्धतीने काम झाल्यास राज्याला दुष्काळी स्थितीची झळ सहन करावी लागणार नाही, असे पवार म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 1:49 am

Web Title: sharad pawar made allegation on cm over drought
Next Stories
1 नांदगावकर यांची याचिकाही औरंगाबाद खंडपीठाकडे वर्ग
2 ‘मजविप’च्या व्यासपीठावरून उद्या आघाडी सरकारवर हल्लाबोल?
3 नव्या जलसंपदा तत्त्वांमुळे लोकप्रतिनिधींची अडचण
Just Now!
X