भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची युती होणार हे निश्चितच होते. मागच्या साडेचार वर्षांमध्ये एकमेकांवर वाट्टेल तेवढे आरोप प्रत्यारोप करून झाले आता युती केली आहे. जनता या दोन्ही पक्षांना ओळखून आहे, यांना पुन्हा निवडून दिलं जाणार नाही अशी खात्री मला वाटत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सोमवरी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे मुंबईत आले होते. त्यांनी भाजपा नेत्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युती जाहीर केली. लोकसभा निवडणुकांचे जागावाटपही जाहीर करण्यात आले. तर विधानसभेसाठी मित्रपक्षांच्या जागा वगळून ज्या जागा उरतील त्या अर्ध्या अर्ध्या वाटून घ्यायच्या असा फॉर्म्युलाही ठरवण्यात आला.

आम्ही एकत्र यावं ही लोकभावना आहे, आम्हाला लोक पुन्हा निवडून देतील असाही विश्वास शिवसेना आणि भाजपाने व्यक्त केला. मात्र युती झाल्याची घोषणा झाल्यापासूनच या दोन्ही पक्षांवर टीका होताना दिसते आहे.

या सगळ्या प्रकारानंतर शिवसेना आणि भाजपावर सोशल मीडियावरून प्रचंड टीका होते आहे. तर विरोधकही शिवसेनेवर तुटून पडले आहेत. शिवसेनेने स्वबळ बाजूला ठेवून युती केली अशी टीका होते आहे. अशात आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही टीकाही शिवसेना आणि भाजपावर टीका केली आहे. मागील साडेचार वर्षांपासून शिवसेना किंवा भाजपा एकमेकांवर कशा प्रकारे आरोप करत होते ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. आता मात्र सत्तेसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. या दोन्ही पक्षांना जनता कौल देणार नाही असे शरद पवारांनी म्हटले आहे.

अजित पवार, पार्थ पवार आणि रोहीत हे लोकसभा लढवणार नाहीत असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तर मी आणि सुशीलकुमार शिंदे लोकसभा निवडणूक लढवणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं. आता शरद पवारांनी केलेल्या टीकेला भाजपा किंवा शिवसेना यांच्याकडून काय उत्तर दिले जाणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.