पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी यानं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. शरजीलनं केलेल्या वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. त्याचबरोबर सेलिब्रिटींच्या ट्विटबद्दल चौकशी करण्याची घोषणा आघाडी सरकारनं केली आहे. त्यावरून फडणवीस यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.

भाजपाच्या मुंबईतील प्रदेश मुख्यालयात देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांना शरजील उस्मानी व सेलिब्रिटींच्या ट्विटबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले,”शरजीलला अटक केलं जात नाही, पण त्याला अटक का केलं नाही म्हणून भाजपाच्या उत्तर भारतीय आघाडीनं आंदोलन केलं. त्या पदाधिकाऱ्यांना घरात जाऊन ताब्यात घेतलं गेलं. हेच सगळ्या मोठं आश्चर्य आहे. त्यामुळे हे शरजीलचं सरकार आहे. त्याला संरक्षण देणारं सरकार आहे, असं आम्ही म्हणालो तर चुकलं काय?,” असा सवाल उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

“सेलिब्रिटींचा प्रश्न आहे, तर ज्यांनी चौकशीची मागणी केली आणि ज्यांनी मागणी मंजूर केली त्या दोघांचंही मानसिक संतुलन बरोबर नाही. त्याची तपासणी झाली पाहिजे. चौकशी तर त्यांच्या मानसिक संतुलनाची व्हायला हवी. कारण भारताच्या सार्वभौमत्वाशी छेडछेड सहन केली जाणार नाही, असं ट्विट आहे. भारताच्या अखंडतेवर हल्ला होऊ देणार नाही, असं म्हणणं चुकीचं असेल तर आपल्या सगळ्यांना सरकारनं अटक करावं, अशी टीका फडणवीस यांनी केली.

आणखी वाचा- राज्यपाल तशी वेळ येऊ देणार नाहीत; अजित पवारांचा सूचक इशारा

“महाराष्ट्रात अशी परंपरा आहे की, विधानसभेच्या अध्यक्षांची निवड एकमताने केली जाते. पण, विधानसभेत विरोधकांना वागणूक कशी आहे. सरकारची भूमिका काय आहे, सरकारचा विरोधकांशी संवाद आहे का यावर हे अवलंबून असतं. त्यामुळे मित्रांसोबत चर्चा करून यासंदर्भात निर्णय घेऊ, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.