शिवसेना आणि भाजपा हे यांच्यात पती पत्नीचं नाही तर प्रियकर प्रेयसीचं भांडण आहे अशी खोचक टीका भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. नाशिकमध्ये बहुजन वंचित आघाडीची सभा पार पडली त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेसवरही त्यांनी टीका केली आहे. एमआयएमला सोबत घेणार असाल तर आम्ही तुमच्यासोबत नाही असे काँग्रेस म्हणते. काँग्रेसला मुस्लिमांची मतं कशी काय चालतात? असाही प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

शिवसेना आणि भाजपा यांच्यातून विस्तवही जात नाही हे महाराष्ट्राने गेल्या पाच वर्षात अनेकदा पाहिलं आहे. तरीही दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. महाराष्ट्रात आम्ही मोठे भाऊ आणि भाजपा लहान भाऊ अशी भूमिका शिवसेनेची आहे. मात्र शिवसेनेच्या तुलनेत जास्त आमदार आल्याने भाजपाला ही भूमिका मान्य नाही. आता मोठा भाऊ लहान भाऊ या नात्याऐवजी प्रकाश आंबेडकरांनी या दोन्ही पक्षांना प्रियकर प्रेयसीच म्हटले आहे.

नाशिकमध्ये बहुजन वंचित आघाडीची सभा पार पडली. या सभेत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. एमआयएमला दूर करा मग आम्ही तुम्हाला सोबत घेऊ असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसला मुस्लिमांची मतं कशी काय चालतात? असा प्रश्नही त्यांनी या सभेत विचारला आहे. तसेच सेना भाजपाचे भांडण हे नवरा बायकोचे भांडण नाही तर प्रियकर आणि प्रेयसीचे भांडण आहे अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी या सभेत केली.