निवडणुकीच्या तोंडावर हिंदुत्त्वाचा मुद्दा पुढे आणून राज्यातील जनतेची दिशाभूल केली जाते आहे असा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केला आहे. राम मंदिराचा आरोप पुन्हा पुन्हा काढल्याने लोकांचा विश्वास बसणार नाही असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय, मराठा आरक्षणाचा फायदा निवडणुकीत होईल असे दिवास्वप्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघत आहेत. मात्र त्यांच्या भूलथापांना जनता फसणार नाही असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ज्या राज्यात जो पक्ष मोठा आहे त्या पक्षांनी भाजपाविरोधात नेतृत्त्व केले तर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणं शक्य होईल असेही शरद पवार यांनी म्हटलं आहे. देश पातळीवर एक आघाडी करतोय हे खरं नाही, पण राज्यांराज्यात सत्ताधारी भाजपाविरोधी गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय असेही पवार यांनी म्हटले आहे. निवडणूक आल्यानंतर राम मंदिराचा मुद्दा पुन्हा समोर आणला जातोय. कारण भाजपाकडे साडेचार वर्षात सांगण्यासारखं काही नाही. म्हणून काँग्रेसमधील एका घराण्यावर टीका करत आहेत. तर दुसरीकडे धर्माचा आधार घेऊन राजकारण करत आहेत. त्यामुळे १० डिसेंबरला सगळे विरोधीपक्ष दिल्लीत एकत्र येणार आहेत असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

देशाच्या संरक्षणासंदर्भात देशाबाहेरच्या शक्तींना प्रोत्साहीत करणं देशाच्या दृष्टीनं योग्य नाही असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. पाच राज्यातील निवडणुकांमध्ये लोकांचा कल समोर येईल कारण मोदी सरकारविरोधात नागरिकांमध्ये असंतोष बघायला मिळतोय या निवडणुकांमध्ये काय ते चित्र स्पष्ट होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.