करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे, पण महापालिकेतील शिवसेना नगरसेविकेच्या नातेवाईकाने कहर  केला. काल बुधवारी रात्री स्वत:चा जीव धोक्यात घालून जंतुनाशकाची फवारणी करणाऱ्या दोघा स्वच्छता निरीक्षकांना मारहाण केली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चौघांना अटक करण्यात आली असली तरी मुख्य आरोपी मात्र पोलिसांना सापडलेला नाही. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ महापालिका कामगार  संघटनेने कामबंद आंदोलन सुरू  केले आहे.

शहरातील प्रभाग पाचमधील शिवसेनेच्या नगरसेविका रिटा भाकरे यांचे नातेवाईक नीलेश भाकरे यांनी जंतुनाशक फवारणीच्या वेळी छायाचित्र काढणे तसेच विरोधकांच्या भागात फवारणी करू नका, असे म्हणत स्वच्छता निरीक्षक सुरेश एकनाथ वाघ व अविनाश वसंत हंस या दोघांना बेदम मारहाण केली. भाकरे यांच्यासह सात ते आठजण त्यांना मारहाण करत होते. औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात स्वच्छता निरीक्षक वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नीलेश भाकरे याच्यासह आठ ते नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने शहरात फवारणी सुरू  केली आहे. स्वच्छता निरीक्षक सुरेश एकनाथ वाघ यांच्यासह कर्मचारी शाकीर पापामियाँ रंगारी, उद्धव वामन भोसले, शिवाजी वाघ तसेच अविनाश वसंत हंस हे रात्री  एकच्या सुमारास नागापूर गावठाण परिसरात जंतुनाशक औषधाची फवारणी करत होते. त्यावेळी नीलेश भाकरे व सात ते आठजण त्या ठिकाणी आले. त्यांनी फवारणी यंत्राचा पाईप हिसकावून घेतला. तसेच आम्ही सांगू त्याच भागात फवारणी करा, असे बजावले. मात्र कर्मचाऱ्यांनी काम सुरूच ठेवले. त्यामुळे जोशात असलेल्या भाकरे याच्यासह सात ते आठजणांनी निरीक्षक वाघ व हंस यांना मारहाण सुरू केली. या मारहाणीत वाघ व हंस हे जबर जखमी झाले. त्यांना प्रथम सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर खासगी रुग्णालयात औषधोपचारासाठी हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारस्वत, अग्निशामक विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ, महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी रुग्णालयात जाऊ न दोघांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

स्वच्छता कर्मचाऱ्यांवरील हल्ला दुर्दैवी

स्वच्छता कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेला हल्ला दुर्दैवी आहे. पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सध्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे महत्त्वाचे आहे. अशा आणीबाणीच्या काळात कामगारांनी आंदोलन करू नये. हल्लेखोरांवर कारवाई करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे.

– श्रीकांत मायकलवार, आयुक्त, महानगरपालिका, नगर

चौघांना अटक, कठोर कारवाई करणार

महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी नीलेश भाकरे यालाही लवकरच अटक करण्यात येईल. आणखी काही आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. आरोपींच्या अटकेकरिता पथक तयार करण्यात आले आहे. जखमी कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर गुन्ह्यला नवीन कलम लावण्यात येईल.

-अनंत पाटील, पोलीस उपअधीक्षक, नगर ग्रामीण