26 September 2020

News Flash

… तर इम्तियाज जलील यांचाही ‘औरंग्या’ झाल्याशिवाय राहणार नाही : शिवसेना

इम्तियाज जलील हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहणास गैरहजर होते.

(संग्रहित छायाचित्र)

गेली चार वर्षे आमदार असताना इम्तियाज जलील हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहणास गैरहजर होते. मराठवाड्यात 17 सप्टेंबर हा दिवस रझाकारापासून मुक्तीचा मानला जातो. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला औरंगाबादचे खासदार आणि एआएमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा दांडी मारली होती. त्यानंतर अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. दरम्यान, शिवसेनेनेही सामना मधील अग्रलेखातून जलील यांच्यावर टीका करत त्यांनी निजामाची चाटुगिरी थांबवली नाही तर त्यांचाही ‘औरंग्या’ झाल्याशिवाय राहणार नाही, असं म्हटलं आहे.

इतिहासातील एमआयएम हा पक्ष रझाकारांच्या बाजूचा होता. आता तो नवा आहे. त्यामुळे आजचा एमआयएम पक्ष वेगळा आहे, हे ध्वजारोहणास उपस्थित राहून दाखवून द्यावे, अशी अपेक्षा पत्रकार निशिकांत भालेराव यांनी व्यक्त केली होती. त्यावर “माझ्या उपस्थिती अथवा अनुपस्थितीवरून कुणी माझ्या देशभक्तीची तुलना करू नये, असे विचार डोक्यात येणे यातून संबंधिताची मानसिकता लक्षात येते. देशभक्तीचं प्रमाणपत्र मला अशा मानसिकतेच्या लोकांकडून घेण्याची गरज नाही,” असे उत्तर दिले होते. त्यात मंगळवारच्या कार्यक्रमाला खासदार जलील हे गैरहजर राहिल्याने वादाला तोंड फुटले होते. शिवसेनेने आता जलील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मराठवाड्याने औरंगजेबाला गाडले, निजामाला गुडघे टेकायला लावले. इम्तियाज जलील यांनी निजामाची चाटुगिरी थांबवली नाही तर त्यांचाही ‘औरंग्या’ झाल्याशिवाय राहणार नाही. मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मा स्मारकासमोर संभाजीनगरची जनताच तुम्हाला गुडघे टेकायला लावेल. आता शासनाने एक करावे, स्वातंत्र्य सेनानींचा हा असा अपमान करणाऱया खासदारास कोणत्याही शासकीय सोहळ्यास बोलावू नये. देवेंद्रजी, काढा हा फतवा! महाराष्ट्रभूमीत अशा जलीलगिरीस थारा मिळता कामा नये! अशा शब्दात शिवसेनेने त्यांना खडेबोल सुनावले आहेत.

काय म्हटलंय अग्रलेखात ?
हिंदुस्थानला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले हे खरे, पण गोव्यात पोर्तुगीज व हैदराबादेतील निजाम स्वतंत्र हिंदुस्थान मानायला तयार नव्हते व त्यांनी स्वतःचे सवते सुभे राखण्यासाठी हिंदुस्थानविरुद्धच लढे उभारले. मात्र त्याविरुद्ध जनता रस्त्यावर उतरली व शेवटी दोन्ही प्रदेश 15 ऑगस्ट 1947 नंतर स्वतंत्र झाले. अर्थात, आजही गोव्यात जसे पोर्तुगीज अवलादीचे शेपूट वळवळत आहे तशी मराठवाडा आणि हैदराबादेत निजामाची पिलावळ फूत्कार सोडीत आहे. ‘एमआयएम’ पक्षाचे पुढारी मियाँ ओवेसी हे ऊठसूट संविधानावर हात ठेवून आम्ही कसे देशभक्त आहोत याचे खुलासे करीत असतात, पण ट्रिपल तलाक, समान नागरी कायदा, वंदे मातरम् म्हणण्यापासून मराठवाडा मुक्ती संग्रामापर्यंत त्यांच्या भूमिका ते देशभक्त असल्याचे सिद्ध करीत नाहीत. त्यांच्या पक्षाचे खासदार जलील हे मराठवाडा मुक्तिदिन सोहळ्यावर बहिष्कार टाकतात हे ओवेसी यांना मान्य आहे काय? ‘एमआयएम’ हा निजामाचा वंश असेल तर त्यांनी तसे स्पष्ट करावे; कारण बनावट देशभक्तीचे त्यांचे ढोंग संभाजीनगरात उघडे पडले आहे. त्यांना मराठवाडा स्वतंत्र झालेला नको. निजाम गेला हे वाईट झाले असे वाटते. म्हणजे ब्रिटिश गेले हे बरे झाले नाही असे वाटण्यासारखेच आहे. संभाजीनगरातील मतदारांनी गळ्यात ही कोणती धोंड बांधून घेतली आहे? याचा पश्चाताप त्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. मराठवाड्याने औरंगजेबाला गाडले, निजामाला गुडघे टेकायला लावले. इम्तियाज जलील यांनी निजामाची चाटुगिरी थांबवली नाही तर त्यांचाही ‘औरंग्या’ झाल्याशिवाय राहणार नाही. मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मा स्मारकासमोर संभाजीनगरची जनताच तुम्हाला गुडघे टेकायला लावेल. आता शासनाने एक करावे, स्वातंत्र्य सेनानींचा हा असा अपमान करणाऱया खासदारास कोणत्याही शासकीय सोहळ्यास बोलावू नये. देवेंद्रजी, काढा हा फतवा! महाराष्ट्रभूमीत अशा जलीलगिरीस थारा मिळता कामा नये!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 7:41 am

Web Title: shiv sena criticise mim mp imtiyaz jaleel hyderabad mukti sangram program saamna editorial uddhav thackeray jud 87
Next Stories
1 मुंबई, ठाण्यात मुसळधार; शाळांना सुट्टी जाहीर
2 तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह ३ जणांवर गुन्हा दाखल
3 नाणारच्या माध्यमातून शिवसेनेला शह देण्याची खेळी!
Just Now!
X