देशातील सगळ्या गावांमध्ये वीज पोहचल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच केला. यावर काँग्रेसने तुम्ही आमच्या कार्याचे श्रेय लाटत असल्याची टीका केली. तर आता शिवसेनेने विजेखाली अंधार हा अग्रलेख आपल्या सामना या मुखपत्रातून लिहित मोदी सरकारवर टीकेचे ताशेरे ओढले आहेत. शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांमधून विस्तव जात नाही हे महाराष्ट्राने आत्तापर्यंत वारंवार अनुभवलेले आहेच. असे असूनही शिवसेना सत्तेत सहभागी आहे. आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. अशात आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्व गावांमध्ये वीज पोहचल्याच्या घोषणेवरही शिवसेनेने टीका केली आहे.

नेमके काय म्हटले आहे अग्रलेखात?

आपल्या देशाचे राजकारण मागील तीन-चार वर्षांपासून ‘युक्त’ आणि ‘मुक्त’ या दोन शब्दांभोवतीच फिरताना दिसत आहे. सरकारचे सगळेच दावे आणि विरोधकांचे त्यावरील प्रतिदावे कधी ‘युक्त’कडून ‘मुक्त’कडे, तर कधी ‘मुक्त’कडून ‘युक्त’कडे हेलकावे घेत असतात. देशातील सर्व गावे वीज‘युक्त’ झाल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा आणि तसे काही नसल्याचा विरोधकांचा प्रतिदावा सध्या असाच इकडून तिकडे फिरत आहे.

देशभरातील फक्त सहाच राज्यांत सरासरी २४ तास वीजपुरवठा होतो असे सरकारी आकडेवारीच सांगते. म्हणजे उर्वरित सर्व राज्ये आणि त्यातील लाखो खेडय़ांत ‘विजेखाली अंधार’ अशीच परिस्थिती आहे. तरीही देशातील सर्व खेडी वीजयुक्त झाल्याचे दावे केले जात आहेत. त्याच्या समर्थनासाठी थेट ‘नासा’चे फोटो सोशल मीडियावर टाकले जात आहेत.

सर्वच बाबतीत फक्त ‘युक्त’ आणि ‘मुक्त’ या शब्दांचाच दांडपट्टा फिरत असल्यावर वेगळे काय होणार? ‘युक्त’ आणि ‘मुक्त’च्या मंथनात सध्या संपूर्ण देशच घुसळून निघत आहे. त्यातून अनेक ‘रत्ने’ निघाली, असा सरकारचा दावा आहे. आता सर्व खेडी प्रकाशमान केल्याचे ‘अमृत’ही निघाले असे राज्यकर्त्यांचे म्हणणे आहे. विरोधक मात्र ते ‘हलाहल’ असल्याचा दावा करीत आहेत. राज्यकर्त्यांचा वादा खरा की विरोधकांचा दावा, या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देईल. तूर्त सामान्य जनता मात्र या मंथनातून ‘चौदावे रत्न’ कधी बाहेर येते आणि ते या मंडळींना कधी दाखवायला मिळते याच्या प्रतीक्षेत आहेत. कारण प्रकाशाचे अमृत आणि अंधाराचे हलाहल या मतलबी राजकारणात विजेखाली ‘अंधारा’चा अनुभव शेवटी जनतेलाच घ्यावा लागत आहे.