अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला ही केवळ अफवा आहे. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही. उद्या ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतील अशी माहिती, शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली. माझं आणि सत्तार यांचं बोलणं झालं आहे. त्यांची आता कोणत्याही प्रकारची नाराजी नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

माझं आणि सत्तारांचं बोलण झालं आहे. त्यांनी राजीनामा दिला या केवळ अफवा आहेत. त्यांची कोणतीही नाराजी आता नाही. त्यामुळे आता हा विषय संपला आहे, असं खोतकर म्हणाले. सत्तार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. ते उद्या दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्र्यांची मातोश्री येथे भेट घेणार आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताचं मी खंडन करतो. उद्या ते सर्व विषयांवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करतील, असंही ते म्हणाले.

अब्दुल सत्तार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर सिल्लोड मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. मंत्रिमंडळात आपल्याला स्थान देणार असल्याची त्यांना आशा होती. परंतु शिवसेनेकडून त्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं. तर पैठणचे आमदार संदीप भुमरे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं सत्तार नाराज होते. परंतु खातेवाटपापूर्वी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याच्या चर्चा रंगत होत्या.