News Flash

औरंगाबादमधील शिवसेनेचा मोर्चा पोलिसांनी रोखला!

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन देण्याचे ठरविले होते.

औरंगाबादमधील दंगलीमध्ये पोलीस निष्प्रभ ठरल्याचा आरोप करीत शिवसेनेने शनिवारी मोर्चा काढला

औरंगाबादमधील दंगलीमध्ये पोलीस निष्प्रभ ठरल्याचा आरोप करीत शिवसेनेने शनिवारी पैठण गेटवरुन काढलेला मोर्चा पोलिसांनी थोडासा पुढे जाऊ दिला आणि लगेच अडविला. फारतर साडेचारशे ते पाचशे मीटर शिवसैनिक मोर्चामध्ये चालले. त्यानंतर खासदार चंद्रकांत खरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. मोर्चेकऱ्यांना सरस्वती भुवनच्या क्रीडा मैदानावर वळविले. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा फौजफाटा बंदोबस्त कामासाठी उतरविला होता.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन देण्याचे ठरविले होते. मात्र, या मोर्चामुळे तणाव निर्माण होईल असे सांगत पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना शहरातील मध्यवर्ती गुलमंडी बाजारपेठेपर्यंतही जाऊ दिले नाही. एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना अटक करावी, अशी मागणी खासदार खरे यांनी केली.

पैठण गेटजवळ भगवे ध्वज उंचावत शिवसेनेचे कार्यकर्ते जमा होऊ लागले. उत्साह वाढविण्यासाठी घोषणा देण्यात येत होत्या. मात्र, मोर्चेकऱ्यांच्या भोवताली पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. पोलीस सहायक आयुक्त विनायक ढाकणे, राहुल श्रीरामे यांच्यासह शीघ्र कृती दल, राज्य राखीव दलातील जवान मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

खासदार चंद्रकांत खरे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक आणि गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळय़ाला हार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. या वेळी महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह महापालिकेतील पदाधिकारी उपस्थित होते. या शिवाय शिवसेनेकडून जितेंद्र महाराज, बोधले महाराजदेखील मोर्चात सहभागी झाले होते.

पैठण गेटजवळून मोर्चा निघताना तो अडविला जाईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, थोडसे अंतर मोर्चेकऱ्यांचा चालू दिले आणि पोलीस आयुक्तांनी नेत्यांना अटक करण्यात येत असल्याचे जाहीर केले. मोर्चात महिला कार्यकर्त्यांही सहभाग असल्याने पोलिसांनी सरस्वती भुवनच्या क्रीडा मैदानात मोर्चा वळविताना कोणी फारसा विरोध केला नाही. त्यामुळे शिवसैनिक क्रीडा मदानात आल्यानंतर जितेंद्र महाराज, बोधले महाराज यांच्यासह खासदार चंद्रकांत खरे यांची भाषणे झाली. शिवसैनिक नसते तर दंगल आणखी भडकली असती असे सांगत खासदार खरे यांनी एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना अटक करण्याची मागणी केली. या नगरसेवकाने पेट्रोल व रॉकेलसारखे पदार्थ दंगेखोरांना पुरविल्याचा आरोप खासदार खरे यांनी केला. त्यांना अटक करण्याची मागणी खरे यांनी केली.

हिंदू एकतेच्या घोषणा

दंगली दरम्यान हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटकेत असणारे शिवसैनिक लक्ष्मीनारायण बाखरिया उर्फ लच्छू पहिलवान व नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांचे मुखवटे शिवसैनिकांनी स्वत:च्या चेहऱ्यावर लावले होते. हिंदू एकतेच्या घोषणा देत कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. पोलीस प्रशासन हिंसाचारात निष्प्रभ ठरल्याचा आरोप करत शिवसेनेने काढलेल्या मोर्चावर भाजपने टीका केली होती. खासदार खरे या घटनेचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपास खरे यांनी नाकारले.

आम्ही कोणतीही चूक केली नाही असे सांगत खासदार खरे यांनी हिंसाचारा दरम्यानच्या वर्तणुकीचे समर्थन करण्यासाठी स्वसंरक्षण करण्याचा अधिकार घटनेने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला असल्याचा दाखला दिला. त्यांनी दगड मारले आणि आम्ही रक्षण केले, असा दावा खासदार खरे यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 1:01 am

Web Title: shiv sena march stop by police in aurangabad
Next Stories
1 औरंगाबादमध्ये आज शिवसेनेचा मोर्चा
2 लातूर बाजार समितीची शासनाकडून कोंडी
3 हिंसाचारावरून शिवसेनेकडून मुख्यमंत्री लक्ष्य ; पोलिसांच्या विरोधात उद्या मोर्चा
Just Now!
X