मंत्रालयात आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी इमारतीच्या लॉबीबाहेर नायलॉनच्या जाळ्या बसवणाऱ्या फडणवीस सरकारवर शिवसेनेने निशाणा साधला आहे. कोलमडलेला शेतकरी मनाने विकलांग झाला असून त्याचे मन अस्थिर झाले तर नायलॉनच्या संरक्षक जाळ्याही त्यास मंत्रालयात घुसण्यापासून रोखू शकणार नाहीत. सरकारच्या उपाययोजना कुचकामी असून आजार पोटाला व प्लॅस्टर पायाला बांधण्याचा हा प्रकार असल्याची खरमरीत टीका सेनेने केली आहे. फडणवीस यांच्या नागपुरातील घरासमोर एका बेरोजगार तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. आता मुख्यमंत्र्यांच्या घराभोवतीही ‘नायलॉन’ची जाळी बांधणार का? असा सवालच सेनेने विचारला आहे.

सरकारदरबारी अडचणी घेऊन येणाऱ्या तरुणाने नैराश्यातून मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयाच्या इमारतीच्या लॉबीबाहेर नायलॉनच्या जाळ्या बसवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा बुधवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेण्यात आला. मंत्रालय हे सुसाईड पॉईंट झाले असून सरकारचेही मन अस्थिर झाल्यासारखे वाटते. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताकडे संशयाने पाहिले जाते, असे अग्रलेखात म्हटले आहे. आत्महत्या हा राज्याला लागलेला डाग असून मंत्रालयाभोवती ‘नायलॉन नेट’ बांधणे हा त्यावर उपाय आहे काय? आत्महत्या घरात व शेतातही झाल्या आहेत. सरकारने मंत्रालयात नायलॉनच्या जाळ्या बसवण्यापेक्षा धर्मा पाटील, हर्षल रावते यांच्यासारख्यांवर आत्महत्या करण्याची वेळच येऊ नये अशी तरतूद करावी, अशी मागणीच शिवसेनेने केली आहे.

दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्येही मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर बेरोजगार तरुणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मग आता मुख्यमंत्र्यांच्या घराभोवतीही ‘नायलॉन’ची जाळी बांधणार का?, हे नायलॉनचे दोर म्हणजे अन्यायग्रस्तांची ‘आत्महत्या’ सोय आहे काय?,  असे सवालच शिवसेनेने विचारले आहेत. शेतकरी उद्ध्वस्त झाला असून त्याचे मन अस्थिर झाले आहे. नायलॉनच्या संरक्षक जाळ्याही शेतकऱ्यांना मंत्रालयात घुसण्यापासून रोखू शकणार नाहीत. सरकारच्या उपाययोजना कुचकामी आहेत. आजार पोटाला आहे व प्लॅस्टर पायाला बांधले जात असल्याची टीका शिवसेनेने केली.