पाकिस्तानी सैन्याकडून भारतात दहशतवादी घुसवण्याचे प्रयत्न दिवसेंदिवस वाढत आहेत हे गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. युद्धबंदीचा करार धाब्यावर बसवून पाकिस्तान रोजच सीमेवर गोळीबार करून दशतवादी घुसवत असताना त्यावर कोणीच बोलत नाही. निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठी उन्मादाचे वातावरण निर्माण केले जात असतानाच पाकिस्तानातून होणाऱ्या घुसखोरीच्या वाढत्या घटनांकडे सरकार डोळे उघडून बघणार आहे काय? असा सवाल करत शिवसेनेनं केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

पाकिस्तानकडून होणाऱया घुसखोरीच्या घटनांची माहितीही संसदेतच देण्यात आली. त्याविषयी चिंता करायला मात्र कोणीच तयार नाही. जम्मू-कश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर सगळं कसं आलबेल झालं आहे, कश्मीरात कशी शांतता पसरली आहे, एकही गोळी कशी झाडली जात नाही, पाकिस्तान कसा वठणीवर आला आहे, दहशतवाद तर जवळ जवळ संपलाच आहे असं सरकारकडून सांगण्यात आलं. परंतु सरकारच्या या गर्जना म्हणलजे केवळ वल्गना होत्या, असा आरोपही शिवसेनेनं केला आहे. सामनाच्या संपादकीय मधून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. ३७० कलम रद्द केल्यापासून पाकिस्तानने तब्बल ८४ वेळा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न केला. सीमेवरील विविध भागांतून झालेल्या या घुसखोरीच्या माध्यमातून तब्बल ५९ पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतात प्रवेश केला आहे. केंद्र सरकारनं दिलेली ही माहिती अधिकृतच म्हणावी लागेल, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात ?
३७० कलम रद्द केल्यानंतरही पाकिस्तानचे डोके ठिकाणावर आलेले नाही आणि सीमेवरून कश्मीर खोऱ्यात अतिरेकी घुसवण्याचे पाकिस्तानी उद्योग अजूनही थांबलेले नाहीत. सीमेवरील आपल्या सुरक्षा दलाचे जवान डोळय़ांत तेल घालून सरहद्दीवर पहारा देत असतात. जवानांच्या या सतर्कतेमुळेच पाकिस्तानकडून होणारे घुसखोरीचे प्रयत्न अनेकदा हाणून पाडले जातात. २००५ ते २०१९ या १४ वर्षांत सुरक्षा दलाच्या जवानांनी घुसखोरीचे प्रयत्न करणाऱ्या ४२ दहशतवाद्यांना पकडले आणि २ हजार २५३ घुसखोरांना पुन्हा पाकिस्तानात पळून जाण्यास भाग पाडले. या १४ वर्षांत तब्बल १ हजार ११० दहशतवाद्यांचा अतिरेक्यांचा आपल्या जवानांनी खात्मा केला. सीमेवर २४ तास खडा पहारा देणाऱ्या जाँबाज जवानांमुळेच देशवासीय सुखाची झोप घेऊ शकतात हे खरे असले तरी भारताला सुखाने झोपू न देण्याची पाकिस्तानी कारस्थाने काही कमी होताना दिसत नाहीत. ऑगस्टपासून पाकिस्तानने घुसखोरीचे जे ८४ प्रयत्न केले, त्यातून ५९ दहशतवादी भारतीय हद्दीत घुसले. म्हणजे एका अर्थाने घुसखोरीचे ते प्रयत्न यशस्वी झाले असेच म्हणावे लागेल.

ऑक्टोबरच्या अखेरीस गृहमंत्रालयाचा जो वार्षिक अहवाल जाहीर झाला तो तर आणखी धक्कादायक आहे. या अहवालानुसार २०१८ या वर्षात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी करण्याचे ३२८ प्रयत्न केले. यापैकी घुसखोरीचे तब्बल १४३ प्रयत्न यशस्वी झाले. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांतील घुसखोरीचा हा उच्चांक होता. २०१८ या एकाच वर्षात २५७ दहशतवादी जम्मू-कश्मीरात मारले गेले आणि चकमकींमध्ये आपले ९१ जवान शहीद झाले. २०१७ मध्ये घुसखोरीच्या ४१९ प्रयत्नांपैकी १३६ प्रयत्न यशस्वी झाल़े. २०१६ मध्ये ३७१ पैकी ११९, २०१५ मध्ये १२१ प्रयत्नांपैकी ३३, तर २०१४ मध्ये घुसखोरीच्या २२२ प्रयत्नांपैकी ६५ प्रयत्न यशस्वी ठरले होते. पाकिस्तानी सैन्याकडून भारतात दहशतवादी घुसवण्याचे प्रयत्न दिवसेंदिवस वाढत आहेत हेच गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी सांगते.