पालघर, भंडारा-गोंदियात आज मतदान

पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत असून त्यासाठी जिल्ह्य़ात मोठा पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला आहे. पालघरची निवडणूक भाजप व शिवसेनेने प्रतिष्ठेची केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रचार केला. या दोघांबरोबरच पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचे आव्हान तगडे आहे. जिल्ह्य़ातील दोन हजारांहून अधिक मतदान केंद्रांवर मतदान होणार असून त्यापकी १४ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. पालघरबरोबरच भंडारा-गोंदिया मतदारसंघात सोमवारी होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १७ लाख २४ हजार मतदार आहेत. त्यात सर्वाधिक चार लाख २९ हजार मतदार हे नालासोपारा विधानसभा मतदारसंघात आहेत. या निवडणुकीत भाजपचे राजेंद्र गावित, शिवसेनेचे श्रीनिवास वनगा, बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यात खऱ्या अर्थाने सामना आहे. काँग्रेस व माकपचे उमेदवार रिंगणात आहेत.

मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार

वादग्रस्त ध्वनिफीतप्रकरणी रविवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, बहुजन विकास आघाडीच्या नेत्या मनीषा निमकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमर वाजपेयी यांनी पालघरचे जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांना भेटून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

कैरानात विरोधक-भाजप आमने-सामने

कैराना (उत्तर प्रदेश): भाजप व विरोधकांच्या एकत्रित ताकदीची कसोटी पाहणाऱ्या कैराना लोकसभा मतदारसंघात सोमवारी पोटनिवडणूक होत आहे. भाजपने मृगांका सिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रीय लोकदलाकडून तबस्सूम हसन या रिंगणात आहेत. त्यांना समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष व काँग्रेसचा पाठिंबा दिला आहे.

भाजप विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत

भाजपसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत असून यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. भाजपची निवडणूक यंत्रणा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराची जनमानसातील स्वच्छ प्रतिमा असा हा सामना आहे. भाजपने ही जागा स्वत:कडे राखण्यासाठी जोरदार तयारी केली आहे, तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही या जागेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे हे कुणबी समाजाचे असून सुमारे चार लाख मतदान या एका समाजाचे या मतदारसंघात आहे. गोंदिया जिल्ह्य़ातील हेमंत पटले हे भाजप उमेदवार भंडारा जिल्ह्य़ात फारसे परिचित नाहीत. तरीही त्यांची पोवार समाजाची मते अडीच ते तीन लाखांच्या घरात आहेत. मतमोजणी ३१ मे रोजी आहे.