वसईतील एका स्टोअरमध्ये ‘मेड इन पाकिस्तान’ मसाल्यांची विक्री होत असल्याची बाब समोर आली आहे. यावर स्थानिक शिवसैनिकांनी आक्षेप घेतला तसेच त्यांनी स्टोअरच्या व्यवस्थापकाला खडे बोल सुनावले. स्टोअरमध्ये एकत्र येत शिवसैनिकांना बराच गोंधळही घातल्याचे सत्रांकडून कळते, त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून संबंधित व्यवस्थापकाने पोलिसांना बोलावून घेतले.


पालघर जिल्ह्यातील वसई शहरात हा प्रकार घडला आहे. इथल्या बिग बझारच्या एका स्टोअरमध्ये ‘मेड इन पाकिस्तान’ छाप असलेली बिर्याणीच्या मसाल्यांची काही पाकिटे विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. ही बाब स्थानिक शिवसैनिकांना समजली त्यामुळे त्यांनी थेट या स्टोअरकडे धाव घेतली. या प्रकाराचा शिवसैनिकांनी स्टोअरच्या व्यवस्थापकाला जाब विचारला. व्यवस्थापकाने या संतप्त शिवसैनिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र, ते ऐकण्याच्या तयारीत नव्हते उलट यावरुन त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. दरम्यान, परिस्थिती बिघडू नये यासाठी खबरदारी म्हणून संबंधीत व्यवस्थापकाने पोलिसांना फोन केला.

या गोंधळानंतर शिवसैनिकांनी संबंधित बिग बझारच्या व्यवस्थापकाला एक पत्र लिहून त्याद्वारे ‘मेड इन पाकिस्तान’ मसाल्याच्या पाकिटांची विक्री करु नये असे बजावले. अन्यथा आमच्या पद्धतीने प्रकरण हाताळू असा इशाराही दिला.