जिल्ह्यचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मयूर स्नॅक्स सेंटर या शिवभोजन केंद्रामध्ये जावून शिव भोजनाचा आस्वाद घेतला. दरम्यान, आतापर्यंत ११ हजार ८३९ शिवभोजन थाळीचे वाटप झाले आहे.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी संजय राईंचवार, नगरसेवक नंदू नागरकर, प्रकाश देवतळे आदी उपस्थित होते. गोरगरिबांना समाधान देणारी शिवभोजन योजना आहे, असे प्रतिपादन यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. शिवभोजन योजनेच्या प्रतिसादानुसार व उत्तम नियोजनाला बघून भविष्यात आणखी अतिरिक्त थाळींची व शिवभोजन केंद्रांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही वडेट्टीवार यांनी या ठिकाणी सांगितले. यावेळी भोजनालयात उपस्थित ग्राहकांशी संवाद साधून पालकमंत्र्यांनी त्यांना याचा व्यवस्थित लाभ मिळतो काय? याची चौकशी केली. जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी यावेळी शिवभोजन थाळीची गुणवत्ता तसेच नियमाप्रमाणे थाळीमध्ये आहार मिळतो की नाही यासंदर्भात तपासणी केली. जिल्हाधिकारी डॉ. खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी देखील यावेळी पालकमंत्र्यांसमवेत शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला. शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे हे वितरण होत असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले. पालकमंत्री वडेट्टीवार यांना शिवभोजना संदर्भात विशिष्ट अ‍ॅपची माहिती सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी संजय राईंचवार यांनी दिली. जिल्ह्यमध्ये मयूर स्नॅक्स सेंटर बसस्थानक जवळ, वैष्णवी रेस्टॉरंट अँड भोजनालय सरकारी रुग्णालय जवळ, विशाखा महिला बचत गंज वार्ड येथे शिवभोजन केंद्रे सुरू आहेत. या तीनही केंद्राला दिवसाला ३५० शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात येत आहे. शेतकरी, शेतमजूर, गोरगरिबांनी शिवभोजन थाळीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.