विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला अंतर्गत गटबाजीतून फटका बसल्यानंतर या दारुण पराभवाला नेमके जबाबदार कोण यावरून आता वादाला तोंड फुटले आहे. म्हाडा पुणेचे माजी अध्यक्ष असलेले आणि भाजपाची उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून कागलच्या रिंगणात उतरलेले समरजितसिंह घाटगे यांनी शनिवारी याबाबतीत खासदार संजय मंडलिक यांना लक्ष्य केले आहे. लोकसभा निवडणुकीत कागल तालुक्यातून मंडलिक यांना ७१ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. तसेच गत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय घाटगे यांना १ लाख १७ हजार मते मिळाली होती. पण या वेळी संजय घाटगे यांना ५४ हजार मते मिळाली असल्याने सेनेची उर्वरित अपेक्षित मते या निवडणुकीत कुठे गेली? असा खडा सवाल त्यांनी केला आहे. याचे स्पष्टीकरण मंडलिक यांनी करावे, असे आवाहन समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत केले.

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेतील लाथाळ्यांमुळे मोठा फटका बसला आहे. त्यातूनच काही मुद्दे खासगीत चर्चिले जात आहेत. यातील वादाला आज समरजित घाटगे यांनी उघडपणे तोंड फोडले आहे. त्यांच्या प्रतिपादनातून खासदार मंडलिक यांनी कागलमध्ये लोकसभेला सहकार्य करणाऱ्या दोन्ही घाटगे ऐवजी अन्य कोणाला मदत केली असावी, असा संशय बोलून दाखवला असून त्यांचा रोख मंडलिक-मुश्रीफ यांच्यातील सख्ख्याकडे जाताना दिसत आहे. याबाबत समरजित घाटगे म्हणाले, पक्षश्रेष्ठींसमोर मतांच्या आकडेवारीचा बागलबुवा करणारे चित्र उभे करून माझी भाजपाची उमेदवारी कापली गेली. हा पूर्व नियोजित कट असावा, असे विधानसभा निवडणुकीत तिघा प्रमुख उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या आकडेवारीतून दिसत आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत मंडलिक यांच्या विजयासाठी मी जीवाचे रान केल्याने त्यांना ७१ हजारांचे मताधिक्य केवळ कागल तालुक्यात मिळाले. त्यामध्ये माझे योगदान होते, हेच स्पष्ट होते. मात्र परतफेडीची वेळ आली तेव्हा मला मदत करण्याऐवजी हेरून बाहेर काढण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.

ते म्हणाले, की विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी फक्त माझ्यावरच आरोप केले. त्या दोघांनी एकमेकांवर आरोप केलेले नसल्याने संशयाला पुष्कळ जागा आहे. यापुढेही कार्यकर्त्यांची चांगली बांधणी करणार आहोत. यापुढेही जोमाने काम करीत राहणार आहे, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये सक्रिय होण्याचे संकेत दिले. या निवडणुकीत मंडलिक यांची संजय घाटगे यांना प्रत्यक्षात कितपत मदत झाली याचा त्यांनी विचार करून पुढील निर्णय घ्यावा, असा सूचक टोलाही समरजितसिंह घाटगे यांनी लगावला आहे.