लातूरच्या शाहू महाविद्यालयात माहिती अधिकार कार्यकर्ते भाईकट्टी यांना बेदम मारहाण
‘तुम्ही काम चांगले करीत आहात. तुमचा सत्कार करायचा आहे,’ असे सांगून माहिती अधिकाराचे कार्यकत्रे मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना बळजबरीने गाडीत बसवून, तसेच त्यांचा मोबाइल बंद करून राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात नेऊन शिवसनिकांनी बेदम मारहाण केली व लोटांगण घालून माफी मागण्यास भाग पाडले. पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने लातूरकर सर्द झाले.
मारहाणीत भाईकट्टी यांच्या पाठीवर, छातीवर, खांद्यावर आणि मांडय़ांवर बराच मुका मार असून, त्यांना पूर्ण बरे होण्यास किमान तीन आठवडे लागतील, असे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. अशोक पोतदार यांनी सांगितले. शैक्षणिक गुणवत्तेत गेले दोन तप राज्यभरात नाव कमावलेल्या राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालयाविरोधात भाईकट्टी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन विनापरवाना बांधकामाची माहिती देत आवाज उठवला होता. शिवसनिक अभय साळुंके व धनराज साठे यांनी सकाळी महाविद्यालयाच्या प्रांगणात नेऊन भाईकट्टी यांच्या अंगावर शाई टाकून साखळी, रॉडने सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांच्या साक्षीने बेदम मारहाण केली. जबर जखमी झालेल्या भाईकट्टी यांना खासगी रुग्णालयात पोलिसांनी दाखल केले. या प्रकरणी शिवसेनेचे साळुंके, साठे व इतरांच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.
भाईकट्टी यांनी लातूरची बदनामी केली. ती आम्ही खपवून घेणार नाही. यापुढे जे कोणी लातूरच्या हिताच्या विरोधात वागतील त्यांना अशाच पद्धतीने धडा शिकवला जाईल. बाहेरून येऊन लातूरच्या चांगल्या संस्थांची बदनामी करीत असेल तर ती आम्ही खपवून घेणार नसल्याचे साळुंके म्हणाले.
मारहाणीनंतर शिवसनिकांनी मला त्यांच्या गाडीतून हॉटेल चितीकरणजवळ सोडून ते निघून गेल्याचे भाईकट्टी यांनी सांगितले.

दुर्दैवी प्रकार- जाधव
घडलेल्या गोष्टीचे समर्थन आम्ही करीत नाही. प्रश्न सोडवण्याची आमची ही कार्यपद्धती नाही. कायद्याच्या चौकटीप्रमाणे महाविद्यालयाच्या त्रुटीसंबंधी लढा देऊ. मात्र, मारहाणीचे समर्थन करणार नाही. आपल्याला याची कोणतीच कल्पना नसल्याचे शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे सहसचिव व राजर्षी शाहू महाविद्यालयाचे माजी प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी सांगितले.

राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात शेकडो विद्यार्थ्यांच्या साक्षीने माहिती अधिकार कार्यकत्रे मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना शिवसैनिकांनी मारहाण केली.