लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आलेल्या असताना आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणे सुरु झाले आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकत्याच पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. एकीकडे पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली युतीच्या बैठका सुरु असताना दुसरीकडे विखे-पाटील यांनी हे विधान केले आहे. मागील साडेचार वर्षात शिवसेनेकडून पंतप्रधानांवर ‘चौकीदार चोर है’, ‘पहिले मंदिर फिर सरकार’ अशा शब्दात टीका केली गेली. मात्र तरीही शिवसेना पक्ष प्रमुख युती करण्यास तयार होतात. यामागे भाजपकडून ईडीचा दबाव असल्यानेच हे होत असावे असा टोला विखे-पाटील यांनी लगावला आहे.

पुढे ते म्हणाले, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना आणि भाजपा युती करण्याची आज घोषणा करणार आहेत. पण मागील साडेचार वर्षांच्या काळात शिवसेनेकडून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली गेली. तरीदेखील भाजपा शिवसेनेच्या दारात जाऊन युती करण्यास तयार झाली आहे. यातून भाजपा सत्तेसाठी किती लाचार झाली आहे हे दिसून येते. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय चिरीमिरी घेऊन युती करीत आहेत याबाबतचा खुलासा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

शहीदांना श्रद्धांजली वाहण्याऐवजी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री इतर कामात व्यस्त

राज्याचे दोन सैनिक शहीद झाले असताना त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू होते. तर त्या ठिकाणाहून २०० किलोमीटर अंतरावर असलेले पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे काही प्रकल्पाचे उदघाटन करण्यात व्यस्त होते. इतक्या अवघड परिस्थितीतही ते शहीदांच्या घरी गेले नाहीत. भाजपाने अशावेळीही पक्षाचा अजेंडा राबविण्याचे काम केले ही शोकांतिका आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपावर निशाणा साधला.