राज्यात भाजपाचं सरकार कोसळून महाविकास आघाडी सत्तेत आली. या सगळ्या सत्तानाट्याला बराच काळ लोटला आहे. पण, ही महाविकास आघाडी नेमकी उदयास कशी आली. तिच्या आकाराचं पहिलं पाऊल कधी पडलं, यावषियीचं गुढ अखेर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उकलून दाखवलं. राऊत म्हणाले,”ज्या दिवशी पवार साहेबांना ईडीची नोटीस आली, सगळा राजकीय तमाशा झाला. त्या दिवशी माझ्या डोक्यात ठिणगी पडली. त्या दिवशी दुपारीच मी शरद पवारांना भेटायला गेलो. सध्या देशात आणि राज्यात जे सुरू आहे, ते बदलायला पाहिजे असं त्यांना सांगितलं. शरद पवार महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत,” असं राऊत यांनी सांगितलं.

नाशिक येथील महाकवी कालिदास मंदिरात खासदार संजय राऊत यांच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मुलाखतीत राऊत यांनी अनेक राजकीय खुलासे करतानाच भाजपाला कोपरखळ्या लगावल्या. राऊत म्हणाले, “आम्ही सत्तेचा अमरपट्टा लावून आलो आहोत. आमची सत्ता आता जाणारच नाही, अशी भावना जेव्हा राजकारणात वाढते तेव्हा देश देश राहत नाही. राज्य राज्य राहत नाही. सत्ता टिकवण्यासाठी वेडेवाकडे उद्योग करू नका. हे वेडेवाकडे उद्योग इतक्या थराला गेले होते की, शरद पवारांना ईडीची नोटीस आली. ज्या दिवशी पवारांना नोटीस आली. त्याच दिवशी माझ्या डोक्यात ठिणगी पडली. त्या दिवशी दुपारी मी शरद पवारांना भेटायला गेलो. सध्या देशात आणि राज्यात जे सुरू आहे ते बदलायला हवं, असं त्यांना सांगितलं. शरद पवार आणि मला आत्मविश्वास होता. सत्ता स्थापनेदरम्यान भाजपाचा आत्मविश्वास पूर्णपणे गेला होता. आमचे फोन ते ऐकत होते,” असं राऊत यांनी मुलाखतीदरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

अंगावर येणार माझं वाकडं करू शकत नाही –

“२०१४मध्ये भाजपाचं सरकार आलं. तेव्हा आम्ही स्वागत केलं. मात्र त्यानंतर लोकशाही धोक्यात येत असल्याचं बघायला मिळू लागलं. देश पुन्हा तुटेल, असं वाटत आहे. धार्मिक द्वेष पसरवला जातोय. तो कधीच नव्हता. आम्ही सरकारमध्ये होतो, तरीही ‘सामना’तून टीका करत होतो. जे माझ्या अंगावर येतात, ते माझं काहीच वाकडं करू शकत नाही. मी फाटका माणूस आहे,” असं राऊत म्हणाले.