हिंमत असेल तर श्रीहरी अणे यांनी यापुढे मराठवाड्यात पाऊ ठेवून दाखवावा, असे आव्हान शिवसेनेचे औरंगाबादमधील खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी दिले.
काही दिवसांपूर्वी जालन्यातील एका कार्यक्रमात अणे यांनी मराठवाडा वेगळा करण्याची भूमिका मांडली होती. यावरून त्यांच्यावर भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र टीका केली. विधीमंडळाच्या कामकाजावरही त्यामुळे परिणाम झाला. अखेर मंगळवारी सकाळी श्रीहरी अणे यांनी महाधिवक्तापदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला होता. अणे यांनी यापूर्वी वेगळ्या विदर्भाची भूमिका मांडली होती. त्यावेळीही शिवसेनेने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हिवाळी अधिवेशनावेळी अणे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्तावही विधानसभेत आणला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत खैरे यांनी अणेंवर टीका केली.
औरंगाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना खैरे म्हणाले, हिम्मत असेल तर अणे यांनी यापुढे मराठवाड्यात पाय ठेवून दाखवावा. त्यांना शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर देण्यात येईल. नाशिकमध्ये काल घडलेल्या प्रकारातून अणेंनी बोध घ्यावा, असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला. खैरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांच्यावरही टीका केली. वैद्य यांचे वय झाले त्यामुळे त्यांना म्हातारचाळे सुचत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वैद्य यांनी महाराष्ट्राचे चार राज्यात विभाजन करण्याची भूमिका मांडली होती. त्यावरून खैरे यांनी त्यांच्यावर टीका केली.