पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात देशवासीयांना काय दिले? त्यांच्या भाषणात नवीन काय? त्यांनी महाराष्ट्राच्या पूरग्रस्तांना काय दिलासा दिला? कोणते आर्थिक पॅकेज जाहीर केले? असा टीकेचा सूर निघू शकेल. तरीही मोदींचे भाषण छोटेखानी, पण प्रभावी होते. त्यात ‘डिसलाइक’ करण्यासारखे काहीच नव्हते असं शिवसेनेने सामना संपादकीमधून म्हटलं आहे.

“देशांतर्गत खऱ्या संकटाची त्यांनी जाणीव करून दिली. त्यांनी कोरोनासंदर्भात सत्य तेच सांगितले. हीच त्यांच्या अध्यात्माची ताकद. ते आले, ते बोलले. शुभ्र दाढी, तेजस्वी चेहरा. या तेजानेच देशातील संकटांचा अंधार दूर होईल. भारतीय जनता पक्षाची हीच भावना असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा,” असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

“पंतप्रधान मोदी यांची स्वतःची एक कार्यपद्धती आहे. त्या कार्यपद्धतीवर कितीही टीका झाली तरी ते त्यांची पद्धत बदलत नाहीत, हे त्यांच्या मंगळवारच्या राष्ट्रीय संबोधनाने स्पष्ट झाले. मोदी राष्ट्राला उद्देशून मंगळवारी संबोधन करणार आहेत, असे जाहीर केल्यापासून अनेकांच्या झोपाच उडाल्या होत्या तर कित्येक जण आस लावून टीव्हीसमोर बसले होते. पण यापैकी काहीच घडले नाही. मोदींनी कुणाला धक्काही दिला नाही व कुणास तूपलोणीही फासले नाही. मोदी यांनी एक मोजके व आटोपशीर संबोधन केले. त्यांनी देशातील कोरोनाचा धोका कायम असल्याचे सांगितले. लोकांनी अजिबात ढिलाई करू नये, असा इशाराच वडिलकीच्या नात्याने दिला. मोदी यांनी फक्त सात-आठ मिनिटांचे कोरोनासंदर्भात जे प्रबोधन केले ते गेल्या सात-आठ महिन्यांतील उत्तम संबोधन होते,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“लॉकडाउन संपलाय, पण करोना संपलेला नाही. देश अजूनही कोरोनाशी लढतोय. ही माणूस जगविण्याची, मानवतेची लढाई असल्याचे त्यांनी सौम्य शब्दांत सांगितले. मोदी यांचा चेहरामोहरा अलीकडच्या काळात बदलला आहे. त्यांची दाढी अधिक शुभ्र व छातीपर्यंत वाढली आहे. त्यांच्या चेहऱ्यावरही वेगळे तेज दिसत आहे. एक तर ते अध्यात्माच्या मार्गाने निघाले आहेत किंवा त्यांनी एखाद्या दीर्घ तपस्येची पूर्वतयारी सुरू केलेली दिसते,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.

“मंगळवारच्या त्यांच्या संबोधनात काही वेळा ‘रामचरित मानस’चा संदर्भ त्याच भावनेतून आलेला दिसला. करोनाचा धोका समजण्यासाठी पंतप्रधानांनी ‘रामचरित मानस’चा संदर्भ घेतला. लॉकडाउनच्या सुरुवातीला मोदींनी ‘महाभारत’ काळात देशाला नेले होते. महाभारताचे युद्ध जिंकण्यासाठी 18 दिवस लागले होते. करोनाला हरवण्यासाठी 22 दिवस लागतील, असा शंख मोदींनी फुंकला होता, पण सात महिन्यांनंतरही हे युद्ध संपले नसल्याचा शंख नव्याने फुंकण्यात आला आहे. मोदी यांनी लोकांना सांगितलं,” असल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे.

“मोदींचे कालचे भाषण हे पंतप्रधानांचे नव्हते तर एका चिंताग्रस्त पालकाचे होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मराठी भाषेत जे संबोधन उद्धव ठाकरे करतात त्याच पद्धतीचे राष्ट्रीय संबोधन श्री. मोदी यांनी दिल्लीत बसून हिंदीतून केले. पण मुख्यमंत्र्यांच्या भाषणास नाके मुरडणाऱयांनी मोदींच्या भाषणास दाद दिली आहे. मोदी यांचे भाषण लोकांना आवडणार नाही व सोशल मीडियावर ‘डिसलाइक’चा पाऊस पडेल, असे भय वाटल्याने ‘डिसलाइक’चे बटनच ‘ब्लॉक’ केले. पण तसे करण्याची गरज नव्हती. मोदींचे 10-12 मिनिटांचे भाषण माहितीपूर्ण होते. श्री. मोदी यांचे राष्ट्रीय संबोधन महाराष्ट्राच्या राज्यपालांनी काळजीपूर्वक ऐकले असेलच. लोक गर्दी करतील अशी ठिकाणे इतक्यात उघडता येणार नाहीत. कारण लोक बेजबाबदारपणे वागत आहेत. हे देशाचे पंतप्रधान सांगतात. तेव्हा त्याचा विचार करायला हवा,” असं मत शिवसेनेने व्यक्त केलं आहे.

“बाजारात हळूहळू उलाढाल वाढत आहे. आर्थिक उलाढालीत तेजी येत असल्याची माहिती मोदींनी दिली. ही गती जास्त कशी वाढेल? कोरोनामुळे जो बेरोजगारीचा भस्मासुर उसळला आहे त्यास कसा अटकाव करणार? यावर पंतप्रधान भूमिका मांडतील, असे वाटले होते. पण मोदींनी चकवा दिला. पंतप्रधानांनी संध्याकाळी सहाच्या भाषणात चिनी सैनिकांच्या घुसखोरीवर बोलावे, आमच्या हद्दीत घुसलेल्या चिनी सैनिकांना उचलून कधी बाहेर फेकणार ते सांगावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले होते. पण त्यापैकी एकाही विषयाला मोदी यांनी स्पर्श केला नाही. मोदी राजकीय व प्रशासकीय असे काहीच बोलले नाहीत. त्यांनी आध्यात्मिक मार्गाने राष्ट्राचे प्रबोधन केले,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“सर्व नागरिकांपर्यंत लस पोहोचविण्यासाठी सरकार शर्थ करेल, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी नवरात्र, दसरा, ईद, दीपावली, छटपूजा व गुरूनानक पर्व आदी सर्वधर्मीय सणांसाठी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. याचा स्पष्ट संदेश असाच आहे की, आपले पंतप्रधान घटनेनुसार ‘सेक्युलर’च आहेत आणि याची नोंद आपल्या राज्यपालांनी घेणे गरजेचे आहे,” असा टोला शिवसेनेने लगावला आहे.