शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनामधून करण्यात आलेल्या टीकेला फडणवीसांनी उत्तर दिलं असून आल्याने घाव वर्मी बसला असल्याचं म्हटलं आहे. संशयास्पद मृत्यूचा धड तपास होऊ न देता आदळआपट करणे हे लोकशाहीचे विकृत रूप आहे. एक ना अनेक प्रश्न राज्याला भेडसावत आहेत त्यावर बोलायचे नाही लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार असं शिवसेनेने म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावल्यानंतर खासदार संजय राऊत यांनीदेखील त्यांना उत्तर दिलं आहे.

सामना अग्रलेखावरुन फडणवीसांचा शिवसेनेला टोला; म्हणाले…

देवेंद्र फडणवीस सकाळी नागपुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सामना संपादकीयमधून करण्यात आलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “जनहिताचे मुद्दे उचलणं जशी आमची जबाबदारी आहे तशी वृत्तपत्रांचीदेखील आहे. आम्ही वीजेबद्दल, शेतकरी, कोविडबद्दल बोललो. पण त्यांना जनहिताचे मुद्दे दिसले नाहीत. त्यांना केवळ टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. असा अग्रलेख आल्याने घाव वर्मी बसला आहे हे लक्षात आलं आहे”.

संजय राऊतांचं उत्तर –
फडणवीसांनी सामनावर केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “सामना वाचतात हे त्यांनी कबुल केलं. सामना वाचणं सुंदर सवय आहे. महाराष्ट्र, देशात सत्य काय घडतंय त्याची माहिती सामनामधून मिळत असते. संपूर्ण जग सामनाची दखल घेतं. त्यामुळे देवेंद्रजींना चांगली सवय लागली असेल तर मी त्यांचं कौतुक करतो”.

काय आहे संपादकीयमध्ये –
“संशयास्पद मृत्यूचा धड तपास होऊ न देता आदळआपट करणे हे लोकशाहीचे विकृत रूप”

मुनगंटीवारांवर टीका
“अधिवेशनात विरोधी पक्षाने उत्तम कामगिरी केली. खरं खोट काय ते नंबर बघू…ही विरोधी पक्षाची भूमिका पुढील साडे तीन वर्ष त्यांनी उत्तम प्रकारे वठवावी. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढील तीन महिन्यात सरकार येईल असं म्हटलं आहे. चांगला विनोद करतात ते…लवकरच महाराष्ट्रातील चित्रपटगृह सुरु होत आहेत. आत्ताच मला काही प्रमुख नाट्य निर्मात्यांचा फोन आला होता. त्यांना काही सूट हवी आहे. मला काही गरज वाटत नाही, सुधीरभाऊंचे असे विनोदी कार्यक्रम ठेवले तर लोक गर्दी करतील,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

“सरकार पुढील तीन वर्ष मजबुतीने काम करेल. सुधीर मुनगंटीवार किंवा भाजपाने त्याबाबत चिंता करु नये. उत्तम विरोधी पक्षाची भूमिका ते निभावत असून त्यांनी त्यात कायम राहावं,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

भाजपाला टोला
पुढे ते म्हणाले की, “कधी कधी खलनायकसुद्धा सिनेमा पुढे घेऊन जातो. नायकासोबत खलनायक सुद्धा ताकदीचा लागतो. आम्ही जेव्हा सिनेमा पाहायचो तेव्हा प्राण, शक्ती कपूर, अमरीश पुरी, निळू फूले, राजशेखर असे अनेक होते. त्यांच्यावर सुद्ध सिनेमा चालत असे. महाआघाडी असल्याने हा महासिनेमा आहे. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांच्यासारखे कलाकार असतात. त्यांनी आपली भूमिका वठवली आहे. पुढील साडे तीन वर्ष या राज्यातील वातावरण खेळीमेळीचं आणि हसतमुख राहील”.