राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची भीती असतानाच निवडणूक आयोगाने दिलासा देत विधानपरिषदेच्या रिक्त नऊ जागांसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत केलं असून महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मिळालेला हा शुभसंकेत आणि शुभनिर्णय असल्याचं म्हटलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विनंतीनंतर दिल्लीत निवडणूक आयोगाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. यावेळी निवडणूक आयोगाने राज्यात २७ मेच्या आधी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राजकीय अस्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना पूर्णविराम  मिळाला आहे. राज्यात करोनामुळे चिंतेचं वातावरण असताना त्यात अशी अस्थिरता निर्माण होता कामा नये. उद्धव ठाकरेंना निवडून येण्यात कोणतीही अडचण नव्हती. पण करोनाच्या संकटामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली. याचं कोणीही राजकारण करु नये”.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “ही वेळ एकमेकांना समजून घेण्याची आहे. आज एक नवा अध्याय सुरु होत आहे. महाराष्ट्राचं सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातच पाच वर्ष राहणार आहे. मग कशाला राजकीय खेळ करायचे. निवडणूक आयोगाने राज्याच्या हिताचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्रासाठी हा शिवसंकेत आणि शुभनिर्णय आहे”.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मागणीनुसार विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला केली होती. म्हणजेच मंत्रिमंडळाने दोनदा शिफारस करूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली जाणार नाही हे राज्यपालांनी स्पष्ट संकेत दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या उभय सभागृहाचे सदस्य नाहीत. तसेच त्यांची २७ मेपूर्वी निवड होणे आवश्यक असल्याने नऊ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी विनंती राज्यपालांनी निवडणूक आयोगाला केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे.