राजस्थानमधील सत्तासंघर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं असून दुसरं काय करु शकतात, ही त्यांची लोकशाही आहे अशा शब्दांत भाजपावर टीका केली आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडमोडींवर वक्तव्य केलं.

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना पैशांची ताकद वापरुन सरकार पाडण्याचं काम सुरु आहे असा प्रश्न विचारला. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, “महाराष्ट्रातील सरकार लोकशाहीविरोधी आहे आणि तिथे आणणारं सरकार पैसे देऊन, आमदार फोडून असेल तर ते लोकशाहीला धरुन आहे. लोकशाहीची ही व्याख्या, ही थट्टाच शिवसेनाप्रमुखांना मान्य नव्हती. म्हणून ते ही असली दळभद्री लोकशाही मला मान्य नाही असं म्हणायचे. त्यावरुन शिवसेनाप्रमुखांना लोकशाही मान्य नाही अशी टीका झाली. ही अशी लोकशाही तुम्ही मानता?”.

राजकारणात पैशांचा वापर वाढत आहे यासंबंधी मत विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, “हे सगळं घृणास्पद आहे. पैशांचा वापर असा केला तर गुन्हा होत नाही. पण जर कोणी तुमच्या विरोधात असेल तर त्याच्या मागे चौकशींचा ससेमिरा लावता. सगळे दिवस काही सारखे नसतात. सगळे दिवस जात असतात”.

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस केलं तर? असं विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे यांनी करुन बघा असं आव्हान देत मी भाकीत थोडीच करु शकतो असं म्हटलं आहे. “असा कोणाताही विरोधी पक्षातील नेता दाखवा जो दुसऱ्या पक्षात जाऊन सर्वोच्च पदावर गेला आहे, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान झाला आहे. मग तुम्हाला तुमच्या पक्षात असं काय मिळत नाही आहे, ज्यासाठी तुम्ही दुसऱ्या पक्षात जात आहात? अशी फोडाफोडी झाल्यानंतर वापरा आणि फेकून द्या ही निती सर्वांनी वापरल्याची अनेक उदाहरणं आहेत. हे आपल्याकडचं राजकारण आहे. हा एक संदेश आहे की, दुसऱ्या पक्षाने आपला वापर करुन फेकून देऊ द्यायचं की आपण आपल्या पक्षात ठामपणे काम करायचं,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

“एखादी व्यक्ती किंवा नेता आपल्यावर अन्याय करत असेल तर त्या पक्षाचा त्याग करुन दुसऱ्याची पालखी वाहणार आहात का? तुम्ही पालखीत बसणार आहात का? तुम्हाला पालखीत बसवण्यास कोणी तयार आहे का? मी कोणाच्याही उज्ज्वल भविष्याआड येऊ शकत नाही, येत नाही. जर तुम्हाला दुसऱ्या पक्षात पालखीत बसण्याचं स्थान मिळत असेल तर नक्की जा. पण पालखीचे भोई होणं एवढंच तुम्हाला समाधान हवं आहे का? पालखीचं ओझं वाहायचं असेल तर जाऊ शकता,” असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. “किती असे पक्षांतर केलेले नेते आहेत जे दुसऱ्या पक्षात जाऊन मोठे झाले आहेत. एका ठराविक काळानंतर त्यांची कारकिर्द संपते,” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.