News Flash

“बहुमत सिद्ध करून द्यायची जबाबदारी शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते”

शिवसेनेनं रोखला बाण

पोलीस खात्यातील काही उच्चपदस्थ अधिकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचं वृत्त राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हवाल्यानं काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. या वृत्तावर गृहमंत्री देशमुख यांनी लागलीच खुलासा करत चर्चेला पूर्णविराम दिला. मात्र, या वृत्तानं राजकीय वर्तुळात चर्चेला विषय मिळाला. याच मुद्यावरून शिवसेनेनं भाजपासह पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर बाण रोखला आहे. शिवसेनेनं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील कामासह पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीवरही भाष्य केलं. आहे.

‘राज्यातील काही बडे पोलीस अधिकारी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत होते’ या विधानाची सध्या राज्यभर चर्चा आहे. हे विधान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्याचं म्हटलं जात होतं. पण, गृहमंत्र्यांनी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यावर खुलासा करत ते विधान फेटाळून लावलं. मात्र, तरीही चर्चा सुरूच असून, यावरून शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करीत फडणवीसांसह पोलीस अधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे. “भारतीय जनता पक्षाचे लोक महाराष्ट्र सरकार पाडण्याचा प्रयत्न काल करत होते. आज-उद्याही करतील. प्रशासन हे निवडून येणाऱ्य़ा लोकनियुक्त सरकारचे असते. एखाद्या राजकीय पक्षाचे नसते. सरकार बदलताच भलेभले अधिकारी टोप्या फिरवतात. उगवत्या सरकारला त्यांना नमस्कार करावाच लागतो. हे फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात सर्व स्तरांवर सुरू असते. महाराष्ट्रातील प्रशासन हे देशात उत्तम आहे. ज्याला आपण ‘प्रोफेशनल’ म्हणतो अशा पद्धतीचा अधिकारी वर्ग महाराष्ट्राला लाभला आहे. सरकार बदलण्याची व पाडण्याची क्षमता त्यांच्यात नाही. राज्याची ती परंपरा नाही. जर एखाद्या मंत्र्यास असे वाटत असेल की, अधिकारी सरकार पाडत आहेत तर ते सरकार अत्यंत ढिसाळ पायावर उभे आहे असे जनतेला वाटू शकते. मुळात फडणवीस यांचे सरकार जाणार नाही या भ्रमात येथील प्रशासन निवडणुकीआधी आणि नंतर काही काळ होते. ते त्याच भ्रमात तरंगत होते. पाच वर्षे फडणवीस व भाजपने एकछत्री अंमल गाजवला. प्रशासनावर फडणवीस सरकारचा अंमल होता व पुनःपुन्हा आम्हीच येणार या विधानाची धुंदी होती. त्यामुळे पोलीस असतील किंवा मंत्रालय, महसूल खाते एकजात सर्व अधिकारी वर्ग त्याच संघधुंदीत गुंग झाला होता. अनेक महत्त्वाच्या नेमणुका संघ परिवाराच्या शिफारशीने किंवा हस्तक्षेपाने होत असत. पोलीस अधिकारी, आयुक्त, सरकारी वकिलांच्या नेमणुकांत हे सर्रास घडत होते. ही व्यवस्था यापुढे अशीच निरंकुश सुरू राहणार असेच वातावरण असल्याने पोलीस, नागरी सेवेतले अधिकारी त्याच व्यवस्थेच्या पांगुळगाड्यावर बसून प्रवास करीत होते, पण 105 आमदारांची ताकद असूनही भाजप सरकार बनवू शकला नाही हे सत्य स्वीकारायला त्यांना वेळ लागला,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

“…त्यामुळे या मंडळींचे मन खट्टू झालं”

“सरकार पाडण्याचा वगैरे प्रयत्न करीत होते ते अधिकारी कोण? याहीपेक्षा काही झाले तरी भाजपचेच सरकार बनले पाहिजे असे मानणारे सहानुभूतीदार कोण, ते महत्त्वाचे. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लादण्याआधी जो पहाटे पहाटे सरकार स्थापनेचा सोहळा पार पाडला त्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असायलाच हवेत व हे सर्व नाटय़ वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर झाले. फडणवीस यांनी पहाटे शपथ घेतली, पण विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे होते. मात्र शपथ घेतलेले मुख्यमंत्रीच यापुढे कायम राहतील, जुनीच व्यवस्था पुढे चालू राहील असे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस व प्रशासकीय सेवेतले बडे अधिकारी ‘स्युमोटो’ नव्या सरकारची रंगसफेदी करण्याच्या आणि भेगा बुजवण्याच्या कामास लागले. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत राहता यावे म्हणून काही पोलीस अधिकारी लहान पक्षांच्या आमदारांना व अपक्षांना वेगवेगळय़ा पद्धतीने जाळय़ात ओढत होते. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करीत होते. गुप्तचर खात्यानेही याकामी विशेष कामगिरी बजावली हे सत्यच आहे. बहुमत सिद्ध करून द्यायची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते, पण त्यांचे काहीच चालले नाही. फडणवीसांचे सरकार कोसळले व महाविकास आघाडीचे सरकार यायचे ते आलेच. त्यामुळे या मंडळींचे मन खट्टू झाले,” असं म्हणत शिवसेनेनं काही पोलीस अधिकाऱ्यांना टोला लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 8:24 am

Web Title: shivsena sanjay raut uddhav thackeray devendra fadnavis anil deshmukh police officers bmh 90
Next Stories
1 रायगड जिल्ह्य़ातील मत्स्य उत्पादनात घट
2 कांदा निर्यातबंदीचा पाच हजार कोटींना फटका?
3 आमदारांसाठी विशेषाधिकाराचा वापर
Just Now!
X