रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जालना येथील दुष्काळाची पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी काही विकासकामांचे उद्घाटनही केले. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच शेतकऱ्याला जो नडेल त्याला शिवसेना आपल्या पद्धतीने सरळ करेल. हे कोणत्याही येडा गबाळ्याचे काम नसून शिवसेनाच हे करेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान यावेळी त्यांनी मुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस 11 धरणांना पाईपलाईनने जोडण्याची जाहीर केलेली योजनेचा उल्लेख केला. तसेच ही उत्तम योजना उत्तम असल्याचे म्हटले. दरम्यान, त्यांनी राज्यातील आघाडी सरकारवरही हल्लाबोल करत राज्यातील अनेक प्रकल्प यापूर्वीच पूर्ण झाले असते, तर पूर्वीच्या सरकारला आज रस्त्यावर फिरण्याची वेळ आली नसती अशी बोचरी टीका केली. दुष्काळी दौऱ्यादरम्यान त्यांनी जालन्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

दुष्काळ निवारणासाठी गावागावांमध्ये जाऊन मदत केंद्र उभारण्यात यावे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी शेतकरी पीक विम्याचाही उल्लेख केला. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक विम्याची माहिती गोळा करा. तसेच ज्यांना पीक विम्याचा फायदा मिळाला नाही त्यांची माहिती गोळा करून माझ्याकडे द्या. त्यांना पीक विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही त्यांनी नमूद केले. तसेच पीक विमा कंपन्यांची सर्व कार्यालये मुंबईतच आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळाला त्यांनी त्यांना शिवसेना आपल्या पद्धतीने फायदा मिळवून देईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

केंद्रात आपली सत्ता असून घटकपक्षांपैकी शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष आहे. नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या आशीर्वादाने पंतप्रधानपदी विराजमान झाले असून त्यांच्याकडे आपण हक्काने मदत मागू शकतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 11 धरणांना पाईपलाईनने जोडण्याची जाहीर केलेली योजना ही उत्तम योजना आहे. याचा आरखडाही तयार केला आहे. तसेच यासाठी पैशासाठी तरतूद करण्यात आल्याची माहितीही मिळाली आहे. परंतु ती झाली नसेल तर शिवसेनेच्या आमदारांनी ती करून घ्यावी. यानंतरही काही कमतरता भासल्यास आपण हक्काने केंद्राकडे याबद्दल निधी मागू असे त्यांनी सांगितले. यापूर्वीच्या सरकारने अशा प्रकल्पांचे केवळ स्वप्न दाखवले. तसेच 70 हजार कोटी आपल्या खिशात घातले आणि आता तेच आमच्यावर टीका करत असल्याचे सांगत उद्धव यांनी राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारवर हल्लाबोल केला.

देशात शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, यासाठी लढणारा शिवसेनेखेरीज अन्य कोणताही पक्ष नव्हता. शरद पवार हे कृषीमंत्री असतानाही शिवसेनेने शेतकरी कर्जमाफीची मागणी केली. शेतकऱ्यांना सर्वप्रथन शिवसेनेनेच कर्जमाफी मिळवून दिली असे ते म्हणाले. सध्याचे प्रकल्प यापूर्वीच्या सरकारने राबवले असते तर त्यांच्यावर आज रस्त्यावर फिरण्याची वेळ आली नसती, असे म्हणत त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला धारेवर धरले. त्यांनी केवळ स्वप्न दाखवली पण आम्ही ते पूर्ण करू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.